जल्लोषामागची स्मशान-शांतता
खरे म्हणजे
शांततेसाठी एवढा आरडाओरडा करायची काहीएक गरज नाही. शांतता व स्तब्धता ही निरवतेने
येत असते व ती एक वैयक्तीक पातळीवरची अनुभूती आहे. ध्यान, धारणा याही वैयक्तीक
पातळीवरच्या अनुभूती असून त्यात अनुस्युत असलेली मनाची एकाग्रता ही एकटेपणाशी
जुळलेली आहे. खरे साधक डोंगरकपारीतल्या गुहांमध्ये जाऊन ध्यानधारणा करीत याचे
दाखले पुराणात सापडतात. अशा सामुदाईक पध्दतीने ध्यानधारणा करण्याचा कुठेही प्रघात
नाही, उलट ध्यानधारणेला बाधक ठरणा-या सामूहिकतेला त्याजून स्वतःला ओळखण्यासाठी अंतर्मुख
होण्यालाच महत्व दिले जाते. यात मानसिक एकटेपणा (Isolation) बरोबर शारिरिक एकटेपणही तेवढेच महत्वाचे आहे. आता दिल्लीत
जो जागतिक शांततेच्या नावाने जो जल्लोष होतो आहे त्याचे अनेक पदर आहेत व देशातील
वातावरण ज्या धर्म-जात-परंपरांच्या नावाने ढवळले जात आहे त्याचा विचार देशाच्या
राजकीय-सामाजिक-आर्थिक अवस्थेशी वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून होणे गरजेचे आहे कारण
देशातील एक मोठा शोषितांचा वर्ग अशा घडामोडींतून भरडला जात असतो व त्याच्या
उध्दाराच्या शक्यता क्षीण होत अशा बेगडी व समारंभी कार्यक्रमातून जीवनाला ख-या
अर्थाने स्पर्शणा-या उपाययोजनाही परिघाबाहेरच ठेवल्या जातात.
हा कार्यक्रम धर्मसत्ता व राजसत्ता या
आजवरच्या इतिहासात एकमेकांना पूरक ठरत आलेल्या परंपरांतील एक आहे. धर्माने
राज्यसत्तेला वैधानिक वा तथाकथित नैतिक अधिष्ठान देत राज्याला पुष्ट करीत रहायचे व
त्याबदल्यात राज्यसत्तेने धर्माच्या गतविधींना संरक्षण देत तो बळकट करायचे असा हा
साधासुधा व्यवहार आहे. या दोघांचा उद्देश सर्वसामान्यांवर सत्ता गाजवणे हाच असतो व
या सत्तेच्या मुळाशी शोषणाचा स्वार्थ असतो हेही लपून राहिलेले नाही. स्वतःला
साधुसंत म्हणवून घेणा-यांनी हा कार्यक्रम केवळ स्वबळावर केला असता तर लोकशाही
देशात त्याला हरकत घेण्याचे कुणाला काही कारण नाही. मात्र ज्या देशाच्या घटनेत धर्मनिरपेक्षतेला
महत्व देत सर्वधर्मसमभाव हा नागरिकांच्या सहजीवनाचा मुख्य गाभा असल्याचे नमूद केले
आहे त्या देशातल्या सरकारांनी आपली वैधानिक कर्तव्ये वा जबाबदा-या पार पाडण्यात
कसूर करत देशातील सांमजस्यालाच धक्का लावण्याचे काम करू नये. हाज यात्रेला सरकारने
आर्थिक मदत देणे जेवढे गैरलागू आहे तेवढेच गैरलागू कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक
निधीचा वापरही आहे. मुख्यमंत्र्यांची सरकारी विठ्ठलपूजा जेवढी निरर्थक ठरते तेवढेच
सरकारी खर्चाने होणा-या मंत्र्यांच्या व अधिका-यांच्या सहकुटूंब शिर्डी वा
तिरूपतीच्या वा-याही ठरतात. या सा-यांना आपापल्या धार्मिक इच्छाआकांक्षा पूर्ण
करण्याचा संपूर्ण अधिकार आहे व तो आपल्या स्वकष्टार्जित कमाईतून केला तरच धार्मिक
ठरतो. हा धर्म ज्यांना समजत नसेल त्यांनी जगाला धर्म शिकवण्याची भाषा करणे यासारखा
विरोधाभास नाही.
स्वामी धीरेंद्र ब्रम्हचारी, चंद्रास्वामी आणि आताचे आसारामबापू या सा-यांची
कारकिर्द व कारनामे संशयास्पद राहिले आहेत. सत्तेतील त्यांचा वावर बघता सत्तेला
धर्म शिकवण्यापेक्षा सत्ता आपल्या सोईसाठी कशी वापरता येईल अशीच त्यांची प्रकरणे
आहेत. सुश्री हे ज्या पोट भरलेल्यांना जीवन जगण्याची कला शिकवतात तेही मागच्या
निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा प्रचार करीत होते असे सोशल मिडियात प्रसिध्द होऊ
लागले आहे. अशा या परोपकाराची परतफेड सत्ताधारी पक्षाने केली असती तर तो धर्म ठरला
असता. मात्र या देशावर ज्या घटकांचा वैधानिक अधिकार आहे तो डावलत सार्वजनिक निधी
वा मालमत्तेचा अगदी सैन्यासकट गैरवापर करत मनमानी चालली आहे ही देशातील
गुण्यागोविंदाने नांदणा-या सर्वधर्मी धर्मनिरपेक्ष जनतेच्या अगोदरच्याच जखमांवर
मीठ चोळण्यासारखे आहे. मेक इन इंडियाचा फियास्को सा-या जगाने बघितला आहे. करारात
नमूद केलेली रक्कम जणू खरोखरच देशात आली आहे असे भासवत सत्ताधारी स्वतःच स्वतःची
पाठ थोपटण्यात धन्यता मानीत आहेत.
ही सारी मांडणी करण्यामागे भारतातील पासष्ट टक्क्यांने असणा-या शेतक-यांच्या
भीषण अवस्थेची झालर आहे. जगण्याची कला तर सोडा, साधे जगणेही अशक्य झालेल्या या
समाजघटकाला घटनेने प्राप्त अधिकारही या देशातील सरकार ज्यावेळी देऊ शकत नाही, त्या
देशाने सा-या जगाला जगद् गुरू होत शांती सुखसमाधानाचे धडे द्यावेत यापेक्षा
विरोधाभास कुठे नसेल. तसे पहायला गेले तर सारा मानव जातीचा इतिहास हा शेतीतल्या
बचतीच्या लुटीचा इतिहास आहे. सारी युध्दे वा लढाया या लुटीच्या वाटपातून झालेल्या
आहेत. आजच्या सरकारांचा बुरखा तेवढा भीषण वाटत नसला तरी एकंदरीत कर्तृत्व बघता
आजही हा मूळ गाभा कायम आहे. खरे म्हणजे सत्तेत प्राबल्य हवे ते उत्पादक वा
पोशिंद्यांचे, ते तसे न रहाता मागचे सरकार दलालांचे तर हे सरकार व्यापा-यांचे.
उत्पादक घटक ज्यात शेतकरी महत्वाचा मानला जातो त्याची आजची अवस्था बघता सरकार या
व्यवस्थेचे प्रयोजन, आयोजन, नियोजन सारेच चूकीच्या दिशेने जात भरकटल्यासारखे
वाटते. देशावर परिणाम करणारी ध्येयधोरणे न बदलता अमुक एक धर्माचा देश झाला म्हणजे
रामराज्य (?) नांदेल अशा भ्रामक कल्पनेत वावरण्यांनी समस्त देशाची घोर
निराशा केली आहे. राहिला प्रश्न या कार्यक्रमाच्या भव्यतेचा. अशी प्रकारची भव्यता
ही नेहमी सामान्यांना घाबरवत दडपून टाकण्यासाठी वापरली जाते. या भव्यतेपुढे तुम्ही
कोणी क्षुद्र आहात व आम्हाला विरोध न करता नतमस्तक होणे हेच तुमच्या हिताचे आहे
असाही नकळत संदेश देण्याचा प्रयत्न असतो.
मुळात हे सरकार खरी परिक्षा न देता अगोदरच्या सरकारच्या नाकर्तेपणा, त्यामुळे
जनतेला आलेले नैराश्य या नकारात्मक भावनेतून एक उपलब्ध पर्याय या अपरिहार्यतेतून सत्तेत
आले आहे. त्याचा अर्थ त्यांनी भलताच घेतलेला दिसतो. हा आमच्या विचाराचा, क्षमतांचा
व सिध्द झालेल्या संकल्पनांचा विजय आहे असे समजत वास्तवापासून दूर जात या देशाला न
मानवणारे अघोरी उपाय त्यांनी अंगिकारले आहेत. सत्य हा कुठल्याही धर्माचा पाया
असतो. तो न पाळणारे अधार्मिक ठरतात. सत्तेवर येण्यासाठी यांनी जे मार्ग अवलंबले ते
बघता कुठला धर्म हे या देशाला व जगाला शिकवणार ? याची अनेक उदाहरणे असली तरी अगदी बटबटीतपणे
पुढे आलेले साधे उदाहरण म्हणजे निवडून येण्यासाठी दिलेल्या खोट्या आश्वासनांचे. शेतक-यांच्या
जीवाभावाचा असलेल्या शेतमाल भावाचा प्रश्न स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारून
सोडवू या आश्वासनाचा वापर करण्याचा धर्म नाकारत निवडून आल्यावर तसे भाव आम्हाला
देता येत नाहीत याबद्दल शेतक-यांची जाहीर माफी मागणे हाही धर्म ठरला असता, तो न
पाळता तो निवडणूक मामला होता असे म्हणण्यासारखा अधर्म नाही. आजवर जगाचे पोट
भरण्यात धन्यता मानणा-या शेतक-यांचा धर्म हाच खरा व अंतिम धर्म असतांना अशा भ्रामक
व दिशाभूल करणा-या कार्यक्रमांकडे दूर्लक्ष करणे हेच आपल्या हाती उरते !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा