रविवार, २३ सप्टेंबर, २०१८

संभ्रमांचा भोपळा....


एकाद्या गोष्टीचं आकलन नीटसं असलं की त्यावरची योग्य ती भूमिका घेत उपाय योजना करता येते. आकलन करून घ्यायची इच्छा प्रामाणिक असली तर तेही शक्य आहे. मात्र एकद्या विषयावरचे समज गैरसमज यांची सरमिसळ करत संभ्रमावस्था निर्माण केली की समस्येची जबाबदारी छानपैकी झटकता येते. शेतीच्या साऱ्या प्रश्नांबाबत आपण असा गोंधळ करून ठेवला आहे की काही एक करायचे म्हटले की या संभ्रमावस्थेला मध्ये आणत काहीही होऊ दिले जात नाही व कोणाला तसे दोषीही ठरवणे कठीण होऊन बसते. एक अस्मानी संकटांचे समजू शकते, मात्र शेतीचे अगदी उत्पादनापासून ते आयात निर्याती – आधुनिक तंत्रज्ञानाच्या  असलेल्या बहुपेडी प्रश्नांबाबत अशी संभ्रमावस्था केली जाते की नेमके काय करावे हे ठरवण्यातच सारी उर्जा व काळ खर्च होत प्रत्यक्षात हाती काही पडत नाही.
शेतीसाठी नेमके काय केले पाहिजे हे ठरवण्यातच आपण आजवर काहीएक करू शकलो नाही हे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे. एक तर शेती हा विषय ऐरणीवर आणला तरी त्याच्या आकलनाबाबतीत इतकी मतेमतांतरे असतात की शेतीला संरक्षण हवे की स्वातंत्र्य ? सरकारी हस्तक्षेप हवा की खुला बाजार ?, भांडवली शेती चांगली की शून्य गुंतवणूक शेती चांगली ?, व्यक्तीगत प्रयत्न प्रभावी की सामूहिक प्रयत्नांची जोड हवी ?, उत्पादनाचे आकारमान महत्वाचे की गुणवत्ता महत्वाची ?, पिक पध्दतीत जेथे जे उत्पादन चांगले येते ते की बाजारात जे खपते ते पेरावे ?, रासायनिक शेती चांगली की सेंद्रिय ?, शेवटी या साऱ्या नियोजनात शेती महत्वाची की शेतकरी, सरकार की ग्राहक ? यांसह अशा अनेक समीकरणांवर खरे उत्तर माहित असले तरी एक गोंधळ उडवून देणारी संभ्रमावस्था निर्माण केली जाते व यात मुख्य केंद्र असलेला शेतकरी व शेती यांच्या पदरात काही एक न पडता तीची दुरवस्था काही संपत नाही.
मुळात शेती ही एक संस्कृती आहे की जीवनशैली ?, उपजिविकेचे साधन की उद्योग ? शेतकऱ्यांचा निजी व्यवसाय की राष्ट्रीय उत्पादनाचे एक साधन ? हेच आपण आजवर ठरवू शकलो नाही. शेती वाचवायची असेल तर शेतकरी जगला पाहिजे व शेतकरी वाचवायचा असेल शेती जगली पाहिजे हे या संभ्रमावस्थेचे चांगले उदाहरण. आपली सारी धोरणेच जर शेती व शेतकऱ्यांच्या विरोधात जाणारी असली तर हे दोघेही कसे वाचतील हे आपण लक्षात घेत नाही. धोरणांचे जाऊ द्या, ती सहजगत्या बदलता येतात, मात्र शेतीला अवरोध करणारे कायदे व त्यांमुळे झालेले दुष्परिणाम हे ढळढळीतपणे दिसत असतांना त्याबद्दल ब्र शब्द न काढणे हे या व्यवस्थेला शेतीत खरोखर काही करायचे आहे का यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. बरे कायदे करणे वा बदलणे ही जर कठीण गोष्ट मानली तरी आहेत ते कायदे तरी शेती व शेतकऱ्यांच्या हितापोटी राबवले जातात का यावरही कोणी विचार करायला तयार नाही. साऱ्या देशातील शेतमाल बाजार नियंत्रित करणारा बाजार समिती कायदा अंमलबजावणीत प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास बनला आहे हे काय धोरणकर्त्यांना दिसत नसावे का ? खुद्द सरकारने जाहीर केलेला किमान हमी दर देण्याची जबाबदारी कायद्याने पाळणे गरजेचे असतांना आज साऱ्या शेतमाल बाजारात आपल्या संभ्रमित निर्णयांनी सारा गोंधळ करून ठेवला आहे.
मुळात या बाबतीत आपण सर्वांनी एक महत्वाची चूक अशी करून ठेवली आहे की आपण शेतीच्या समस्या व दुरवस्थेची कारणे व त्यांचे निराकरण हे सरकार नावाच्या व्यवस्थेत शोधू पहात असतो. आजवर शेतीच नव्हे तर साऱ्या जगात निर्माण झालेल्या अनेक समस्यांना सरकार हीच व्यवस्था जबाबदार धरली जात असून आपणही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकार क्या समस्या सुजलायेगी, जो खुद एक समस्या बन चुकी है अशी भूमिका घेतली आहे. सरकार हे शेतीच्या समस्यांचे उत्तर नसून शेतीत पिकणाऱ्या शेतमालाचे संपत्तीत रुपांतर करणारी बाजार नावाची जी व्यवस्था आहे ती न्यायी, निकोप व सुदृढ करणे महत्वाचे आहे. बाजार हा उत्पादक व ग्राहकाला सारखाच न्याय देणारा असतो मात्र कायद्याचे राज्य असले तर. आजची सरकारे विशेषतः जी केवळ शेतीच्या धोरणावरच टिकून असतात, त्यांनाच शेतीचे भवितव्य ठरवू देणे म्हणजे शेळीने खाटकाकडे मला मारू नको म्हणत विनवण्यासारखे आहे. जोवर खाटकाची मानसिकता व त्याच्या दृष्टीने असणारे शेळीचे महत्व ओळखत यावर विचार होत नाही तोवर ही व्यवस्था असेच संभ्रम निर्माण करत आपला कार्यभाग साधत राहील.                                    डॉ. गिरधर पाटील ९४२२२६३६८९.   

सोमवार, २९ जानेवारी, २०१८

गरज कृषि प्रशासकीय लवादाची !!



        गरज कृषि प्रशासकीय लवादाची !!
     कृषिक्षेत्रात प्रशासनाने घातलेल्या हैदोसाची उदाहरणे काही कमी नाहीत. किटकनाशकांच्या गैरप्रकारात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना न्याय न मिळताच खान्देशात जीव हेलावून टाकणारे एक प्रकरण प्रकाशात आले आहे. विखरण गावचे धर्मा पाटील हे आपल्या शेतकऱ्यांना त्यांचा विहित व वैधानिक अधिकार न देणाऱ्या प्रशासनाचे बळी ठरले असून या प्रकरणात लोकप्रतिनिधीसह साऱ्यांनी शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार लक्षात येऊन देखील सरकार त्याबाबत परिणामकारक कारवाई करायला तयार नाही. उलट धर्मा पाटलांना अमिषे वा धमक्या देऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न होत असून दोषींना पाठीशी घालण्याचा अश्लाघ्य प्रयत्न होतांना दिसतो आहे.
समृध्दी मार्गातील शेतकऱ्यांच्या जमीनी अगोदरच सरकारातील काही अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी आपल्या ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना वाढीव दराचा फायदा न मिळू देता त्यातील प्रचंड नफ्याचा भाग हडप केल्याची प्रकरणे उघडकीला आली आहेत. धर्मा पाटलाचे प्रकरण हे जमीनीचा मोबदला शेतकऱ्यांना कसा नाकारला जातो याचे एक चांगले उदाहरण आहे. त्यांची जमीन एका विद्युत प्रकल्पासाठी अधिग्रहित केली गेली. त्यासाठी मिळणाऱ्या मोबदल्यात गैरप्रकार करणारी शासकीय अधिकारी व फुढारी यांची एक टोळीच यात कार्यरत असून शेतकऱ्यांना थोडेफार पैसे देऊन त्याच शेतकऱ्याच्या नावाने करोडो रुपये हडप करणाची प्रकरणे उघड झाली आहेत. यात पैसे खाण्यासाठी त्या जमीनीवरच्या झाडे व संसाधनांचा चुकीच्या पध्दतीने पंचनामा करून पैसे हडप केले जातात. धर्मा पाटलांची पाच एकर जमीन असून ते या टोळीला सामील न झाल्याने त्यांना चार लाखांचा मोबदला देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. मात्र त्यांचाच शेजारी ज्याची केवळ काही आर जमीनीवर खोटा पंचनामा दाखवत या टोळीने एक कोटी वर काही लाखांचा मलिदा काढला. धर्मा पाटलांचा आक्षेप एवढाच होता की एकाच शिवारातील जमीन, सारखीच फळझाडे व संसाधने असतांना माझ्या जमीनीला एवढा कमी मोबदला कां ? त्यांचा आक्षेप बरोबर असूनही प्रशासनाने त्यांच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही कारण सारे प्रकरण बाहेर यायची शक्यता होती. ऐंशी वर्षांच्या धर्मा पाटलांना स्थानिक प्रशासनाने काहीच न्याय न दिल्याने यात अनेक उच्चपदस्थ असल्याची शक्यता बळावते. या वयोवृध्द शेतकऱ्याला शेवटी न्याय मिळवण्यासाठी मुंबईला येण्याचा फतवा काढला व त्या दिवशी आपले सारे आजार व तब्येत सांभाळत हा शेतकरी मुंबईला पोहचला त्या दिवशीची बैठक रद्द झाल्याचे कारण सांगण्यात आले. वास्तवात आजच्या मोबाईलच्या काळात बैठक रद्द झाल्याचे धर्मा पाटलांना सहज कळवता आले असते. अशा परिस्थितीत मुंबईत रहाणे शक्य नसल्याने धर्मा पाटलांने अगतिक होत आत्महत्येचा निर्णय घेतला व मंत्रालयातच विष प्राशन करून ते आज जे जे त जीवाशी झुंज देत आहेत. आता या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पदच नव्हे तर हा प्रकार खरा असण्याचा कबूलीजबाबच देणारी सिध्द होते आहे.
 प्रशासकीय कर्तव्ये व शिस्त बाध्य करणारी व सरकारच्या वैधानिक कार्याची हमी देणारी व्यवस्था कोणालाच नको आहे. आज साधा तलाठी जेव्हा एकाद्या शेतक-याला सांगतो, जा, मुख्यमंत्र्याकडे गेलास तरी माझं काही वाकडं होणार नाही, तुला काय करायचे ते कर.असे सांगण्याचे धैर्य त्याला कुठून लाभते यातच आजच्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे संबंध काय व कशा प्रकारचे निश्चित झालेत याची प्रचिती येते. याचे खरे कारण या भ्रष्टाचारी कारभारातून निर्माण होणा-या अवैध पैशात आहे व सरकारच्या  अधिकृत महसूलापेक्षा कित्येक पटींनी यात आर्थिक उलाढाल होत असते व याची वाटणीव्यवस्था शिपायापासून मुख्यंमंत्र्यांपर्यंत बिनबोभाटपणे कार्यरत असते. अशात मी सरकारमध्ये आहे व भ्रष्टाचार करीत नाही असे जर कोणी सांगत असेल तर तो निश्चितपणे खोटे बोलत आहे असे समजावे.
 शेतक-यांवरच्या या सा-या प्रशासकीय अन्यायाचे प्रमाण बघता त्याच्या सोडवणुकीसाठी एक स्वतंत्र दंडाधिकार असलेला आयोग असणे महत्वाचे आहे. सरकारी कर्मचा-यावर त्यांनीच अन्याय केला तर मॅट नावाचा आयोग त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. असा एक आयोग वा लवाद शेतक-यांसाठी असणे फार आवश्यक आहे. या आयोगात शेतक-यांवर झालेल्या सा-या प्रशासकीय अन्यायाच्या तक्रारींची दखल घेत दोषींना कडक कारवाई होणे महत्वाचे आहे. यासाठी सा-या बाधित शेतक-यांनी एकत्र येत राष्टपती वा राज्यपाल यांच्याकडे ही मागणी लावून धरली पाहिजे. अशा मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी काय मार्ग असू शकतात याचा आपल्यातीलच कायदेतज्ञांनी मार्गदर्शन करत या मागणीला पुढे रेटले पाहिजे.
                                                         डॉ. गिरधर पाटील 9422263689

रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

कर्जमाफीच्या अपरिहार्यता.....



            कर्जमाफीच्या अपरिहार्यता.....
     सध्या कृषिक्षेत्रात गाजत असलेला कर्जमाफीचा मुद्दा अनेक परिमाणे ओलांडत आता शेतकऱ्यांचा आवाका व सरकारच्या नियंत्रणाबाहेर नेला जात आहे. एक मात्र खरे की राजकीय पंडीतांनी हा कर्जमाफीचा मुद्दा अशा अवस्थेत आणून सोडलाय की सरकार व शेतकरी या दोघांनाही ना तर तो गिळता येत ना तर ओकता येत. या राजकीय खेळात या मुद्यावर शेतकरी एवढा संवेदनशील झालाय की कर्जमाफीबद्दल कुठलेही वास्तव विश्लेषण करायला घेतले की त्याला लगेचच शेतकरी विरोधक समजत ते हातघाईवर येऊ लागतात. अर्थात खुद्द शेतकऱ्यांचे समजले जाणारे पुणतांब्यांचे आंदोलन हाताळण्यात तत्कालिन शेतकरी नेतृत्वाच्या काही चूका झाल्या असल्यातरी त्या अपयशाच्या धक्क्यातून शेतकरी मात्र अजूनही सावरू शकत नाही. या शेतकरी नेतृत्वाला सरकारची एकंदरीत भूमिका लक्षात न आल्याने सारे आंदोलनच भरकटले व सरकारला जे हवे होते ते घडत या आंदोलनाची गंभीरता व तीव्रता क्षीण होत गेल्याचे दिसते. कर्जमाफी मिळाली तर कुणाला नको आहे असे मुळीच नसतांना त्या बाबतीतले वास्तव न समजून घेता, त्याबाबतची परिणामकारक भूमिका न ठरवता हा लढा चालूच राहिला तर त्यातून फारसे निष्पन्न व्हायची शक्यता नाही.
          मुळात देशात झालेल्या राजकीय परिवर्तनामुळे कर्जमाफीच नव्हे तर शेती व शेतकऱ्यांच्या साऱ्यां प्रश्नांचे परिप्रेक्ष्यच बदलले असल्याने शक्यता व संभाव्यातांचे गणित बदलले आहे. पूर्वीचे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत फार सकारात्मक होते असेही नाही. त्यांची कर्जमाफीही हा शेतकरी प्रेम नव्हे तर एक राजकीय निर्णयच होता. विरोधकांची शेतकऱ्यांमध्ये काय परिस्थिती आहे व शहरी मते निवडणुकांवर काय परिणाम घडवू शकतात याचा तत्कालिन सत्ताधाऱ्यांना अंदाज न आल्याने व भाजपासारख्या सत्ताविन्मुख पक्षाने आता नाही तर केव्हाच नाही अशी प्रचारात आघाडी घेत सत्तेवर ताबा मिळवल्याचे दिसते. त्याहीवेळी म्हटले जायचे की निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची मते निर्णायक ठरत नाहीत. दर निवडणुकीचे विशिष्ठ एक गमक असते व ती नस ज्या पक्षाला सापडते त्या पक्षाला यश मिळण्याच्या शक्यता वाढतात.
भाजपाला मागच्या निवडणुकीत शहरी मतदारांची अलिबाबाची गुहा सापडली व आपल्या कार्यक्रम पत्रिकेला अनुरूप असलेल्या या वर्गाला कुरवाळले तर आपले कायमचे मतदारसंघ तयार होत सत्तेवर कायम ताबा ठेवता येईल अशी त्यांची अटकळ आहे. या साऱ्या चित्रात ग्रामीण भाग व शेतकरी कुठेही नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आजही त्यांच्या अभ्यासानुसार सत्ताप्राप्तीसाठी आवश्यक असे मतदारसंघ आजच तयार आहेत व त्यासाठी त्यांना शेतकऱ्यांची गरज नाही असे त्यांचे नेते जाहीरपणे बोलू लागले आहेत.
या जाहीर वक्तव्यापूर्वीची या नव्या सरकारची शेतकरी धोरणे बघितली तर ती फारशी सकारात्मक असल्याचे दिसत नाही. एका मोठ्या वर्गाला कशाला दुखवायचे म्हणून ते काहीतरी सांगून वेळ मारून नेत मात्र प्रत्यक्षात या वर्गाला काहीच मिळणार नाही याची दक्षताही घेतली जात होती. भाजपाचा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास व घेतलेली मेहनत गृहित धरूनसुध्दा एवढीवर्षे आपल्याला सत्ता मिळू न देण्यात केवळ ग्रामीण भागच कारणीभूत असल्याचा गैरसमज आजही आहे व या वर्गावर असलेला राग आताशा स्पष्टपणे व्यक्त होऊ लागला आहे. दुष्काळातील सरकारची भूमिका केवळ तोंडदेखलेपणाची होती व माध्यमे हाताशी धरून सरकार फार काही करते आहे असे चित्र तयार करण्यात आले. जलस्वराज योजनेचा पहिल्याच वर्षी फज्जा उडाला असून ज्या भागात काम झाल्याचे सांगितले जाते तो मराठवाडा व विदर्भ आजही दुष्काळाला बळी पडल्याचे दिसते आहे. हमी भावाचे प्रश्न असतील, सोयाबीन, तूर, कांदा या साऱ्या संवेदनशील व शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देणाऱ्या पिकांबाबत सरकारने कुठलीही स्पष्ट भूमिका न घेता उलट त्यातली गंभीरता वाढत ते क्लिष्ट करण्यात आले.
कर्जमाफीच्या बाबतीतही सरकारची सुरूवातीची भूमिका नकारात्मकच होती व मुख्यमंत्री कर्जमाफीच्या विरोधातच होते. मात्र निवडणुकांमध्ये तो कळीचा मुद्दा होऊ शकतो व शिवसेना संपवण्याच्या प्रयत्नात त्या निवडणुकीत केवळ कर्जमाफीमुळे शिवसेनेला बळ मिळाल्याचे दिसताच दिल्लीवरून शेतकऱ्यांविषयाची भूमिका मवाळ करण्याचा निरोप आला असावा. या निवडणुकांचा परिणाम म्हणा व त्याचवेळी निघू लागलेले लाखोंचे मराठा मोर्चे म्हणा वा पुणतांब्यासारख्या अराजकीय क्षेत्रातून केवळ शेतकऱ्यांचे म्हणून उभे राहिलेले आंदोलन म्हणा सरकारला माघार घेत कर्जमाफी देत असल्याचे जाहीर करावे लागले. मात्र यातही सरकारने तत्वतः, सरसकट व अतार्किक अटींचा मारा करत या साऱ्या कर्जमाफीतील हवाच काढून टाकली आहे.
आताच्या परिस्थितीतून दोन शक्यता उद्भवतात. एकतर सरकारचे वागणे इतके अन्यायी व अतार्किक ठरावे की कुणातरी भेदभावाच्या मुद्यावर न्यायालयात गेले तर सरकारला ते हवेच आहे, कारण त्यामुळे चेंडू न्यायालयात जात सरकारला त्या जबाबदारीतून आपली मान सोडवून घेता येईल. दुसरी शक्यता अशी आहे की आलेल्या अर्जातून काही विशिष्ठ शेतकऱ्यांना थातूरमातूर कर्जमाफी दिल्याचे दाखवायचे व इतरांना छाननीच्या नावाने लटकवून ठेवायचे व शेतकरी आंदोलनातील सारी हवाच काढून टाकायची अशी ही रणणीती आहे. यावरचा शेतकऱ्यांच्या बाजूचा उपाय म्हणजे शेतकरी मते निवडणुकीत प्रभावी ठरत नाहीत हा समज खोटा ठरवणे. काय म्हणता ?
                                                                     डॉ. गिरधर पाटील 9422263689

रविवार, ७ मे, २०१७

जनता महत्वाची की सरकार ?



             जनता महत्वाची की सरकार ?
          म्हणायला आपण लोकशाही स्विकारल्याचे दिसत असले तरी आपले सारे जनजीवन हे विरोधाभासानी भरले जात असल्याचे दिसून येईल. लोकांनी, लोकांद्वारा, लोकांसाठी योजलेली लोकशाही यातील लोक नेमका कुठे लोप पावला हे लक्षात न आल्याने या व्याख्येचे मूळ प्रयोजनच हरवल्यासारखे दिसते आहे. आपण आपल्यासाठी निर्माण केलेल्या लोकशाही गाभा असलेल्या साऱ्या संकल्पनात्मक, संस्थात्मक व्यवस्था आज आपल्याच विरोधात उभ्या ठाकत स्वातंत्र्यापूर्वी सुराज्य व समृध्दीची जी स्वप्ने पाहिली गेली त्यांना बाजूला सारत एक वेगळीच व्यवस्था उभी रहात स्वातंत्र्य मिळाल्याचा सर्वसामान्यांना काही एक लाभ मिळू द्यायचा नाही अशा अविर्भावात आव्हान देऊ लागली आहे. अर्थात या नकळत झालेल्या प्रक्रियेला निसर्गनिर्मित कारणांबरोबर आपल्याला लोकशाही समजून न घेता ती राबवता न आल्याने जनतेच्या पदरातही या अपयशाचे फलित टाकता येईल.
          या आजच्या चित्राचे नीटसे आकलन करून घ्यायचे असेल तर काही समर्पक उदाहरणांची मदत घेत ते समजून घेता येईल. शहरांतून कुत्रा पाळणे व शेतकऱ्याने कुत्रा पाळणे यात फरक आहे. म्हणजे प्रगत देशातील लोकशाही व भारतासारख्या सरंजामी मानसिकेतेची शिकार झालेल्या जनतेची लोकशाही यात फरक करायला हवा. शेतकऱ्यांच्या कुत्र्यावर शेताच्या व बकऱ्यामेंढ्यांसारख्या ढोरढाकऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी असते. आपले काम प्रामाणिकपणे केल्यानंतर कुत्रा धन्याच्या दाराशी येऊन बसतो व शेतकरीही जेवणाची वेळ झाली की आपल्या ताटातील कोरचतकोर भाकर टाकत (आपण देत असलेले कर) त्याच्या पालन पोषणाची काळजी घेत असतो. इथवर हे सारे वैधानिक व नैसर्गिक असल्याचे दिसून येईल. मात्र कल्पना करा कुत्र्याच्या डोक्यात (माफ करा, कुत्रा असे करू शकतो याची कल्पना करणेही कुत्र्यावर अन्याय करण्यासारखे होईल, पण एक काल्पनिक उदाहरण म्हणून आपण तशी मांडणी करतोय) हवा जात आपल्या कामासंबंधी काही विकृत समीकरणे तयार होत या व्यवस्थेतील आपले साधारण स्थान विसरत आपण अनन्यसाधारण असल्याचे समजत वावरू लागला तर शेतकरी, शेत रक्षणाच्या जबाबदाऱ्या या गौण ठरत साऱ्या व्यवस्थेची प्राथमिकता ढासळत एक असंतुलनाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजे कुत्रा आपले वैधानिक काम विसरत शेतकऱ्याला आपला मूळ उद्देश असलेले शेतीचे काम करणे अशक्यप्राय करून टाकणे (शेती विरोधी कायदे), आपल्या जबाबदाऱ्या विसरत एकाद्या झाडाच्या सावलीखाली झोपा काढणे (वेळेवर निर्णय न घेणे), भूक असो की नसो (अवाजवी करांचा बोजा) शेतकऱ्याच्या अंगावर जाऊन त्याचे ताट हस्तगत करून आपली राक्षसी भूक भागवणे, (सक्तीची वसूली), प्रसंगी शेताचे, प्राण्यांचे नुकसान होत असले तरी त्याकडे दूर्लक्ष करणे (वंचितांच्या शोषणाकडे दूर्लक्ष), शेतकरी, त्याचे आप्तस्वकियांना मज्जाव करत चोरांना वाव देणे (कायदा व सुव्यवस्था), आपला खरा अन्नदाता कोण आहे हे विसरत शेजारच्यांचे हित पहाणे (डागाळलेल्या अनावश्यक आयाती निर्याती), या अशा अनेक बाबींचा समावेश करता येईल.
          आता या परिस्थितीला कारणीभूत असलेले शेतकऱ्याचे अज्ञान, असंघटितपणा, आपलेच भाऊबंद जातीधर्म, पक्षांच्या आधीन जात निजी स्वार्थ विसरलेले, आर्थिक निरक्षरता, व्यावहारिकतेचा व हिशोबीपणाचा अभाव, वस्तुनिष्ठतेचा अभाव, निवडीच्या लोप पावलेल्या क्षमता, त्यात भर घालणारी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीटीसारखी अस्मानी संकटे हे सारे असले तरी त्यातून मार्ग काढणे हे आज जिकिरीचे ठरू लागले आहे. एकेकाळी आपल्या दाराशी बसून चतकोर भाकरीची अपेक्षा करणारा आपणाच पाळलेला कुत्रा असा कसा वागू शकतो हे त्याला कळनासे झाले आहे. ही हाताबाहेर गेलेली परिस्थिती हाताळणे अशक्यप्राय होत असल्याने तो आपल्या घरातील दोरखंड व झाडाची फांदी शोधू लागला आहे. वास्तवात कुत्र्यात असलेल्या काही अवगुणांना वाव मिळेल अशी परिस्थिती निर्माण होऊ देण्यात शेतकऱ्यासह साऱ्यांचा सारखाच सहभाग असल्याचे दिसून येईल. म्हणजे कुत्र्याच्या साऱ्या सामाजिक, आर्थिक सुरक्षेची हमी, चुकांना प्रायश्चित्त नसणे, कामाची जन्मभरची निश्चिंतता व त्याला घटनात्मक हमी, बांधिलकी जनतेशी की सत्ताधाऱ्यांशी यातील संदिग्धता,यातून त्यांचे स्वार्थ जोपासण्याची क्रिया इतकी पराकोटीला गेली की शेताच्या मालकाला हा कुत्रा जुमानेसा झाला आहे.
          आता शेतमालकाच्या मनातील खळबळ त्याला अस्वस्थ करू लागली आहे. आपल्या हक्कासाठी कसे लढावे हा त्याच्यापुढचा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्य मिळवतेवेळी परकीय सत्तेकडून काहीतरी मिळवण्याची जी काही आंदोलनात्मक हत्यारे वापरली जात नेमकी तीच, पण आज निष्प्रभ ठरलेली हत्यारे वापरत आपस्वकियांशीच लढण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. एकतर या साऱ्या गदारोळातून वैधानिक मार्गाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे नेतृत्व आज दृष्टीपथात येत नाही. आहे ते आपले सारे राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी मतांच्या राजकारणाचे निवेदने, रस्ता रोको, उपोषणे, यात्रा, यासारखी वर्षानुवर्षे निष्फळ ठरत आलेली आंदोलने केली जात आहेत. मुख्य म्हणजे या प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ज्या लोकप्रतिनिधींची असते ते विरोधातील वा सत्तेतील, साऱ्यांनी शेतकरी हिताचा गदारोळ उठवत आहे त्या गोंधळात भर टाकण्याचेच काम चालू आहे. म्हणजे वैधानिक मार्गाने आपल्याला शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी केवळ शेतकऱ्यांना कारूण्याचा विषय करत त्यासाठी आपल्यापेक्षा इतरांनी काय केले पाहिजे याच्या मागण्या करत आंदोलने केली जात आहेत. शेतकरीही आपल्या लोकप्रतिनिधींना लक्ष्य न करता त्यांना जबाबदार न धरता त्यांच्यामागे फरफटत जात आहेत. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जबाबदार असलेले सारेच, मग ते सत्तेत असतील वा विरोधात, विधानसभेच्या बाहेर जो गोंधळ घालताहेत, त्यापेक्षा आकड्यांची मदत घेऊन शेतकरी हिताचे प्रस्ताव मांडत शेतकऱ्यांच्या बाजूचे खरे कोण आहेत हे त्या प्रस्तावाच्या बाजून वा विरोधात मतदान करतांना उघडे पाडता येऊ शकते. मात्र त्यात आपल्या साऱ्यांचे खायचे दात उघड होत असल्याने सारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे राजकारण करू लागले आहेत.
          शेतकऱ्यांनी आता या राजकीय भुलभुलैय्याचे शिकार न होता आपल्या मागण्यांचा प्रस्ताव आपल्या लोकप्रतिनिधी, म्हणजे आमदार खासदारांना द्यावा व ते प्रश्न विधानसभेत वा संसदेत मांडण्यास सांगावे. त्यांना यासाठी ठराविक मुदत द्यावी व त्याची पोच घ्यावी. या साऱ्या लोकप्रतिनिधींना, मग ते सत्ताधारी असोत की विरोधक, आपल्या दृष्टीने काही फरक पडत नाही, कारण आपले प्रश्न विधीमंडळात जाण्याशी आपले मतलब आहे. यावर दिलेल्या मुदतीत लोकप्रतिनिधींनी हे प्रश्न न मांडल्यास आपल्या परिक्षेत्रातील न्यायालयात या लोकप्रतिनिधींच्या विरोधात आपले कर्तव्य पार न पाडण्याचा गुन्हा दाखल करावा व मतदार संघातील साऱ्या शेतकऱ्यांच्या सह्या दाखल करत या लोकप्रतिनिधीवर आमचा विश्वास न राहिल्याची याचिका करावी. त्यावर काय करायचे ते न्यायालय ठरवील परंतु आपले प्रश्न मार्गी लावण्याचा तो एक प्रभावी सनदशीर मार्ग असल्याचे दिसून येईल. यातून शेतकऱ्यांचे बाजूचे नेमके कोण आहेत हे सिध्द होण्यामुळे स्वार्थी राजकारण्याचे भविष्यही अधोरेखित होत असल्याने निवडणुक होण्याआधीच तिच्या निकालाची कल्पना येऊ शकेल. घाणेरड्या राजकारणाचे शुध्दीकरण, नागरिकांचे सक्षमीकरण व परिणामकारक लोकशाही हे तिन्ही उद्देश यात साध्य होत असल्याने जागरूक शेतकऱ्यांनी हा प्रयोग करून पहाण्यास हरकत नाही.
                                                                  डॉ. गिरधर पाटील 9422263689