गुरुवार, ३१ मार्च, २०१६

ग्रामीण राजकारणाचा बदलता आलेख



         ग्रामीण राजकारणाचा बदलता आलेख
     जिथे सा-या देशातीलच राजकारण ढवळून निघते आहे त्याला महाराष्ट्रासारखे संवेदनशील राज्य अपवाद समजण्याचे काही कारण नाही. सर्वव्यापी विविधता हे आपल्या देशाचे गुणवैशिष्ठ्य समजले जाते. तसे येथील राजकारणाचे देखील आहे. दर दोन कोसावर जिथे भाषा बदलते तेथे एकजिनसी राजकारणाची अपेक्षा फोल ठरते. महाराष्ट्रातील राजकारणाचे काही ठळक पदर आहेत त्यात सध्या काय बदल होऊ घातले आहेत हे बघणे महत्वाचे ठरेल. या सा-या बदलांना मूर्त स्वरूप देणारी उमलणारी तरूणाई, तंत्रज्ञान समृध्द माध्यमे, सोशल मिडियासारख्या नव्या माध्यमाचा उदय, जनतेच्या लोकशाही वा सरकार या व्यवस्थांकडच्या वाढत्या अपेक्षा, त्या पूर्ण न होण्याची ज्ञातअज्ञात कारणे व आपल्या गरजांनुसार मतदार करीत असलेली पर्यायी निवड व त्यातून होणारे राजकीय ध्रुवीकरण ही वैशिष्ठ्ये मानता येतील. याला राज्यातील दुष्काळ व त्यातून ग्रामीण जीवनातील ताणतणाव आताशा पिण्याच्या पाण्याच्या स्वरूपात शहरी जनजीवनापर्यंत येऊन ठाकले आहेत. यात नैसर्गिक कारणांचा काय व किती सहभाग आहे याबरोबर सरकार आपली विश्वासार्हता सिध्द न करू शकल्याने सारी जनता चिंतायुक्त संभ्रमावस्थेत आहे.
          दिल्लीत जेएनयु प्रकरणात डाव्या उजव्यांचा वाद परत एकदा पृष्ठभागावर आल्याने आहेरे व नाहीरे या वर्गांतील सीमारेषा आणखी ठळक होण्यात मदतच झाली आहे. त्यात विजय मल्ल्यासारखे प्रकरण, उद्योगांना देण्यात येणा-या सवलती वा करोंडोंची कर्जमाफी या पार्श्वभूमीवर ग्रामीण वा शेतक-यांचे प्रश्न, देशातील दुष्काळ व त्यामुळे प्रकट होणारे विरोधाभास यातून भारतीय राजकारणाचा पोत बदलायला सुरूवात झालीय का असा शोध राजकीय अभ्यासक घेऊ लागले आहेत. या सा-या बदलांचा व्यापक कॅनव्हास हा गेल्या सरकारचा नाकर्तेपणा, त्यातून भाजपाने एक अपरिहार्य ठरु पहाणा-या पर्यायाचे घेतलेले स्थान, मतदारांनीही बहुमत देऊन स्विकारलेला हा पर्याय, हा राजकीय तत्वज्ञान वा विचार स्विकारून झालेला बदल नव्हता तर एका प्राप्त परिस्थितीतून सुटका मिळवण्याचा परिस्थितीजन्य मार्ग होता. त्यामुळेच लोकांच्या अपेक्षापूर्तीतून येणारी भ्रमनिराशा भाजपाला नंतरच्या निवडणुकांतून आपले ते सर्वश्रेष्ठ स्थान अधोरेखित करण्यात अपुरी पडली. दिल्ली वा बिहार या राज्यांतील निवडणुकांतून भारतीय मतदारांनी परत एकदा आपल्या स्वतंत्र निवडीची झलक दाकवल्याने आता येणारे राजकारण नेमके कुठे व कसे जाईल याबद्दल शाशंकता निर्माण झाली आहे.
भारतीय राजकारणातील डावे व उजवे प्रवाह या तात्विक बैठकीवर राजकीय ध्रुवीकरणाचा महत्वाचा पाया समजला जातो. देशातील काही पूर्वापार चालत आलेले प्रश्न वा तात्कालिक स्वरूपाचे प्रश्न यांना डावे-उजवे या समीकरणात बांधण्याचा प्रयत्न होत आलेला आहे. एकाद्या प्रश्नाचे डावे उत्तर हे वा उजवे उत्तर हे यात तो प्रश्न सोडवण्यापेक्षा सत्ताकारणाच्या मैदानात आणला जातो. यात संघटित व विपुल संसाधने असणारा वर्गच ताकदवर असल्याने त्यांचा आवाज प्रखर होत त्यात नाहीरे वर्गातील दरी वाढत देशातील अर्थकारणाला एक वेगळे स्वरूप आले आहे. तशात साम्यवादी हे भांडवलशाहीच्या विरोधात समजले जात असल्याने आहेरे व नाहीरे वर्गांची विगतवारी सोपी होत तसे ध्रुवीकरण येणा-या राजकारणात दिसू शकेल असे संकेत दिसू लागले आहेत. याचे एक महत्वाचे कारण हेही समजता येईल की जागतिकीकरणापूर्वीचा साम्यवाद व जागतिकीकरणानंतरचा साम्यवाद यात कमालीचा बदल झालेला दिसून येईल. बंगालमध्ये खुद्द ज्योति बसूंनी घेतलेले काही आर्थिक निर्णय हे डाव-उजवे यांच्या सीमारेषा ओलांडत घेतले होते व आपल्या विचारात होत असलेले बदल दिशादर्शक होते.
खुद्द इंग्लंडमध्ये हुजूर व मजूर या पक्षांनी आपल्या परंपरागत भूमिका व भाषा बदलत अर्थवादी जगाची नवी भाषा स्विकारत नवे राजकारण स्विकारले आहे. रशियासारख्या मोठ्या देशात अर्थवादाचे वारे कधीच वाहू लागले आहेत. चीनची सारी प्रगती हाच अर्थवाद अधोरेखित करते. यावरून हे मात्र स्पष्ट होईल की डाव्यांच्या भांडवलशाहीविरोधी अशा भूमिकेपेक्षा शोषक-शोषित या मांडणीचा भारतीय परिप्रेक्ष्यात योग्य संदर्भ लागू शकेल. तशात आता सा-या भांडवलशाह्यांनी कल्याणकारी धोरणांचा गाजावाजा चालवलेला असल्याने व्यवस्थेतील शोषण प्रवणता हुडकून त्यात आपली जागा मिळवण्याची चांगली संधी डाव्यांना मिळू शकते. यात गरिब-श्रीमंत या समीकरणाबरोबर शहरी-ग्रामीण वर्गात शोषण बाधित वर्गाचे स्वार्थ निश्चित करता येतील. या डाव्यांचे कामगार संघटनांवरील वर्चस्व शहरी भागात दिसत असले तरी काही अदिवासी पट्टे वगळता त्यांना शेतक-यांच्या उजव्या समजल्या जाणा-या संघटनांत शिरकाव मिळालेला नाही. आज डाव्यांना नाशिकच्या आंदोलनात दिसणारा शेतक-यांचा पाठिंबा हा तात्विक बैठकीवरचा नसून आज प्रस्थापित राजकीय व्यवस्था न्याय देऊ शकत नसल्याने त्या विरोधातील चीड व्यक्त करण्याच्या भावनेचा आहे. मात्र यातून एक लक्षात घेतले पाहिजे की आपली गरजपूर्ती जिथे शक्य आहे तेथे दिलासा शोधण्याचा प्रयत्न होईल व त्यात डावे-उजवे न बघता तात्कालिक निर्णय घेतले जातील.
आज तशा उजव्या समजल्या जाणा-या शेतकरी संघटनांची परिस्थिती काय आहे हे खुद्द सत्तेत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अवस्थेवरून दिसून येईल. खुद्द तुमच्या घरातच तुम्हाला कोणी विचारत नसेल तर बाहेर कोण विचारणार ? एकेकाळी अत्यंत सशक्त व अभ्यासू समजली जाणारी शेतकरी संघटना आज अनेक शकलांत विखूरलेली दिसते. रघुनाथ दादा संघटनेचा विचार कायम ठेवत डाव्यांशी काही आंदोलनात एकत्र येण्याची संधी शोधत होते त्या प्रयत्नांचा निकाल समजू शकलेला नाही. विदर्भातील काही जूने नेते काहीतरी नवे घडवण्यासाठी खरोखर प्रामाणिक प्रयत्न करताहेत. मात्र एवढे खरे की शेतकरी संघटनेने शहाणा केलेला शेतकरी आज आहे तेथेच आहे, त्यांचे नेतृत्व करणारे नेते अधांतरी आहेत, मध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या आर्थिक संकटात सापडलेल्या व राजकीय पंगुत्व आलेल्या एवढ्या मोठ्या समाजाला कसे सक्रिय करावे हा मोठा यक्षप्रश्न आहे.
                          डॉ. गिरधर पाटील girdhar.patil@gmail.com  9422263689

रविवार, २० मार्च, २०१६

विरोधाभासी कृषिनीती



                    विरोधाभासी कृषिनीती
          दिल्लीत नुकतेच किसान उन्नती मेला या कृषिविषयक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मेळाव्याच्या उद् घाटन प्रसंगी केलेल्या भाषणातून सरकारचा शेतीकडे पहाण्याचा दृष्टीकोन काय आहे व भविष्यात या शेतीत कुठल्या बाबतीत बदल आवश्यक वा अपेक्षित आहेत याचे एक दिशादर्शक चित्र अपेक्षित होते. या बदलांची निकड अशासाठी की कधी नव्हे ते भारतीय कृषिक्षेत्र अस्मानी व सुलतानीच्या गंभीर संकटातून जात असतांना देशातील एका प्रमुख उद्योगाबाबत सरकारची कृषिनीती काय असणार आहे याबाबत उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. पंतप्रधानांच्या भाषणातून जे मुद्दे पुढे आले ते सरकारची भूमिका स्पष्ट करणारे असले तरी मागील काळात ते अगोदरच मांडले गेल्याने त्यात नाविन्य असे काही नव्हते. अर्थसंकल्पीय भाषणातून पंतप्रधानांनी येत्या पांच वर्षात शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. अतिशय आकर्षक वाटणारी ही घोषणा प्रत्यक्षात कशी अमलात येणार याची सा-या अभ्यासकांच्या मनात चिंताजनक उत्सुकता होती. निदान या मेळाव्याचे निमित्त साधून पंतप्रधान त्यावर अधिक प्रकाश टाकतील अशी अपेक्षा असातंना त्याबाबतही निराशा झालेली दिसते.
          एकंदरीतच पंतप्रधानांनी शेतीचे जे चित्र रंगवले ते अपूरे तर होतेच त्याचबरोबर त्यात अनेक विरोधाभासही जाणवले. त्यांनी हरित क्रांतीचा उल्लेख केला. शास्त्रीय दृष्टीकोन, प्रगत तंत्रज्ञान यांच्या मदतीने भारतीय शेतक-यांनी भारताला आपल्या कृषिविषयक गरजांमध्ये स्वयंपूर्ण केले हा त्यातला महत्वाचा भाग. यात सिंचनाचे प्रयोग, हायब्रीड बियाणी, रासायनिक खते व किटकनाशकांचा प्रथमच व्यापक स्तरावर वापर करण्यात आला व भारतीय शेतीत एका नव्या प्रयोगाची सुरूवात झाली. आताही दुस-या क्रांतीचा उल्लेख करतांना त्यांनी पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, आसाम, ओरिया या पूर्व पट्ट्यातील राज्यांचा उल्लेख करातांना त्यात परत याच प्रकारे क्रांती अपेक्षित आहे का याबाबत काही खुलासा केला नाही. तशी ही राज्ये मागास समजली जातात. या क्रांतीचा मूळ गाभा असलेले प्रगत तंत्रज्ञान, रासायिनिक खते व किटकनाशकांच्या वापराबाबत त्यांनी पंजाब व हरियानाच्या शेतक-यांबद्दल नाराजी व्यक्त करतांनाच दुसरी क्रांती कशा प्रकारची असावी याचा खुलासा झाला नाही. पुढे त्यांच्या भाषणात सेंद्रिय शेतीचा उल्लेख आला तेव्हा या राज्यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून ही दुसरी क्रांती आणावी की काय असे वाटले तरी भारतातल्या मागासप्रदेशात जी काही शेती होते ती सेंद्रिय शेतीपेक्षा वेगळी असते असे दिसत नाही. शिवाय देशातील सहासष्ट टक्के जिरायत शेती ही आपोआपच सेंद्रिय होत असते. कारण या शेतीचा आर्थिक स्तर महागडी रासायनिक खते वा किटकनाशके वापरण्यास सक्षम नसल्याने नैसर्गिकरित्या हाती येईल ते पिक अशी परिस्थिती आहे. मात्र म्हणून या पिकाला सेंद्रीय म्हणून इतर पिकांपेक्षा जास्त भाव मिळाला असे होत नाही. म्हणजे ज्या शेतीतून शेतक-यांच्या किमान गरजांही भागवल्या जाऊ शकत नाही त्या प्रकारच्या शेतीतून क्रांती घडावी असे अपेक्षित असेल तर मग प्रश्न मिटला.
          परदेशात सेंद्रिय अन्नाची मागणी वाढत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले मात्र त्याबाबत सरकारची एकादी प्रोत्साहनपर योजना आहे का याबाबतीत मौन बाळगले. कारण आज ज्या भारतीय पिकांना, मग ती सेंद्रिय असोत की नसोत, जागतिक बाजारात चांगली मागणी असतांना केवळ सरकारच्या धरसोडीच्या आयात-निर्यात धोरणांमुळे शेतक-यांना परदेशी बाजारातून नफा कमवता येत नाही. शेतक-यांचे उत्पन्न वाढवण्याचा तो एक प्रभावशाली मार्ग असतांना केवळ देशात महागाई वाढू नये म्हणून आयात-निर्यातीत हस्तक्षेप करीत स्वतःच शेतक-यांच्या उत्पन्नवाढीच्या विरोधात सक्रिय होत असते. कांदा, कापूस ही त्याची ठळक उदाहरणे.
          शेतक-यांचे दर एकरी उत्पादन कमी असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र त्यातूनही जे काही उत्पादन येते त्याला आपण न्याय देऊ शकतो का ? नाही. भले आमच्या गाई कमी दूध देत असतील, मात्र त्या देत असलेल्या दुधालाच आम्ही योग्य भाव देतो का ? नाही. अतिरिक्त उत्पादन झाले तर पहिली धडकी भरते ती शेतक-यांना. आज या अतिरिक्त उत्पादनामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. अतिरिक्त गहू खरेदीच्या हौसेपोटी सरकारच साठवणुकीत त्याची नासाडी करीत असते. पंजाब मध्ये किमान हमी दराने गव्हाची खरेदी होते तेव्हा खाजगी बाजारात गव्हाचे काहीही दर असले तरी खाजगी खरेदीला पंजाब व हरियानात परवानगी नसते. अनेक शेतमाल बाजारात भाजीपाला व फळांसारखी नाशवंत पिके केवळ बाजार सक्षम न होऊ दिल्याने शेतक-यांना साठवणुकीच्या सोई न केल्याने फेकून यावा लागतो हे शेतक-यांचे नुकसान जर या व्यवस्थेमुळेच होत असेल तर याच व्यवस्थेतून शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार ? या व्यवस्थेतील सुधारांबाबत काहीही उल्लेख झाला नाही.
          शेताच्या बांधावर वृक्ष लागवड, मधनिर्मिती, कडूलिंबाच्या बीयांचा व्यापार अशा फुटकळ व दातकोरू मार्गातून शेतक-यांचे उत्पन्न वाढवता येऊ शकते असा आशावाद की युक्तीवाद त्यांनी केला आहे. प्रश्न शेतक-यांचे उत्पन्न शेतीतून वाढवण्याचा आहे. त्याला अतिरिक्त पैसे मिळवण्याचे मार्ग लॉटरीच्या तिकिटापासून ते मटका खेळण्यापर्यंतचे असू शकतात. सरकारला अशाच पध्दतीने शेतक-यांनी आपापले उत्पन्न वाढवून घ्यायचे अपेक्षित असेल तर मग या प्रयत्नात सरकारची तशी गरजच काय ? शेतक-यांचे उत्पन्न काही एक न करता वाढवता येऊ शकते तो खरा मार्ग म्हणजे शेतीत व शेतमाल बाजारात सरकार, त्याची धोरणे व शेतीवर फुकट पोसल्या जाणा-या बांडगुळ लाभार्थ्यांचा प्रभाव जोवर दूर होत नाही तोवर यात काहीही होणे अशक्य आहे.
          ज्या तंत्रज्ञानाचा पंतप्रधानांनी या दुस-या कृषि क्रांतीसाठी उल्लेख केला ते तंत्रज्ञान भारतीय शेतक-यांना मिळण्यात प्रमुख अडचण त्यांच्याच सरकारची असल्याने जनुकीय बियाण्यांबाबत काहीही उल्लेख झाला नाही. सरकारशी संबंधित संस्थाच या प्रगत तंत्रज्ञानाला विरोध करताहेत, त्यावर पंतप्रधानांची काय भूमिका असणार ? एकीकडे प्रगत तंत्रज्ञानाचा उदोउदो करायचा, त्याचवेळी भारतीय शेतक-यांना सेंद्रीय शेतीचा सल्ला द्यायचा यातला विरोधाभास कसा दूर करणार ? ज्या ऑनलाईन शेतमाल बाजाराचा उल्लेख वारंवार होतो तो होईल तेव्हा होईल मात्र आजच्या शेतमाल बाजारात किमान वजनमापाच्या वा साठवणुकीच्या सोई ज्या कायद्याने बाध्य आहेत त्या आज शेतक-यांना देऊ शकत नाही त्याबाबत काय बोलणार ? असे अनेक विरोधाभास या कृषि धोरणात आहेत. सरकारने अगोदर शेतीच्या मूलभूत बाबींचा अभ्यास करावा व नंतर सल्लावजा प्रबोधन करावे. अन्यथा प्रत्यक्ष ज्ञानाने हुषार झालेला शेतकरी सरकारच्या या धोरणांवर कितपत विश्वास ठेवेल हे येणारा काळच ठरवील.
                                   डॉ. गिरधर पाटील girdhar.patil@gmail.com  9422263689

रविवार, १३ मार्च, २०१६

सत्तेच्या गल्ल्यातील विजय मल्या !!



        सत्तेच्या गल्ल्यातील विजय मल्या !!
          कुठल्याही धंद्याचा प्रमुख उद्देश हा गल्ला भरण्याचाच असतो. असा धंदा हा व्यवसाय समजून केला तर या गल्ल्यात निदान काही नैतिकतेची अपेक्षा करता येते, मात्र आजच्या राजकारणासारखा तो एक बटबटीतपणे केलेला धंदा असला तर त्यात विजय मल्या व त्याच्या भाऊबंदकीने भरलेल्या अनैतिकतेचाच भरणा झालेला दिसतो. आणि हा राजकारणाचा धंदा भारतीय संविधानातील न्याय, समता व बंधुत्वाची शपथ घेऊन सत्तेचा उपयोग जनहितासाठी केल्याचे दाखवले जाते तेव्हा आपल्या सार्वजनिक प्रामाणिकपणा व सचोटीची खरी कसोटी लागत असते. आज उघड होणा-या अनेक प्रकरणांतून सरकारची ही सचोटी व प्रामाणिकपणा संशयाच्या भोव-यात सापडली असून सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या नावे बोटे मोडत सारा दोष व्यवस्थेवर ठकलत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. आता गेली साठ वर्षे या देशातील विचारवंत, तज्ञ व सज्जनजन हे कालबाह्य कायदे बदला म्हणून टाहो फोडताहेत त्याकडे सहेतुक केलेल्या दूर्लक्षाचा मात्र कधी उल्लेख होत नाही. संसदेचे खरे काम कायदे करण्याचे असतांना सारी राजकीय व्यवस्था आपल्या सोईसाठी सा-या देशाला वेठीस धरली असून त्याला विजय मल्ल्यासारखी लागलेली कडू फळे व त्याचे परिणाम सर्वसामान्य विशेषतः शेतकरी समाजाला भोगावे लागताहेत.
          भारतीय राज्य घटनेने सा-या नागरिकांना समान अधिकार दिला आहे. यात जातपात, र्म, गरिब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण, साक्षर-निरक्षर, गोरा-काळा असा कुठलाही भेद न करता प्रत्येकाला एका मताचा समान अधिकार दिला आहे. म्हणजे घटनेने स्थापित सरकारनेही सर्व नागरिकांना समानतेने वागवावे असा त्याचा अर्थ होतो. आता सरकारच एका नागरिकाला एक न्याय व दुस-याला दुसरा असे वागत असेल तर ते घटनाविरोधी ठरते. सरकार विजय मल्ल्या प्रकरणाला जो न्याय देत आहे तसाच न्याय देशातील इतर कर्जादारांनाही द्यावा वा इतर कर्जदारांना जी वागणूक मिळते ती विजय मल्ल्याला द्यावी असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र प्रत्यक्षात सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेता हा समान न्याय नसल्याचे जाहीर झाले आहे. विजय मल्ल्याला मिळालेली एवढी कर्जे वसूल करण्यात बँकांची झालेली हतबलता स्पष्ट दर्शवते की ही सारी कर्जे ही विनातारण व अगोदरची कर्जे फेडण्यासाठी सतत दिलेली नवीन कर्जे अशा स्वरूपाची आहेत. पूर्वी या बँका खासगी होत्या तेव्हा अशाच मनमानी व्यवहारांची चलती थांबवण्यासाठी त्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मात्र राष्ट्रीयीकरणाचा दुसरा अर्थ लावत या बँकाचा नफातोटा, विशेषतः तोटा हा सरकारी समजला जाऊन कसेही गैरव्यवहार करण्याचा एक परवानाच या बँकाना मिळाला. आताही या अर्थसंकल्पात या बँकांचा असा अनैतिक तोटा भरून काढण्यासाठी पंचवीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे बुडवलेले पैसेही जनतेचे व त्याची भरपाई करण्यासाठी परत जनतेचेच पैसे वापरणे यात राजकारणी व बँकांचे व्यवस्थापन यांनी आपापल्या तुंबड्या भरायच्या व जबाबदारी झटकत हात वर करायचे हे केवळ भारतातच शक्य आहे.
          आता याच बँका सर्वसामान्य ग्राहकांशी कशा वागतात ? कार्पोरेट क्षेत्राच्या खालोखाल या बँकाचा धंदा असतो तो शहरी ग्राहक म्हणजे बिल्डर,व्यापारी व पगारदार वर्ग. या सा-यांची पत तशी वसूलीयोग्य असल्याने त्यांना प्राधान्य दिले जाते. मात्र या बँकांची ज्यांना खरी गरज असते त्या ग्रामीण भागाला व शेतक-यांना नेहमीच या सार्वजनिक सुविधेच्या लाभाच्या परिघाबाहेर ठेवले जाते व त्यांच्या ख-या गरजा भागवण्याच्या दृष्टीने ना तर या बँका काही करतात ना सरकार त्यांना आपल्या कर्तव्यासाठी बाध्य करते. आता अर्थसंकल्पात ज्या पतपुरवठ्याची तरतुद केल्याचे दाखवले जाते त्याचे प्रमुख उद्दिष्ट या राष्ट्रीकृत बँकांना दिले जाते. एका अहवालानुसार या सा-या बँकांनी आपल्याला दिलेल्या उद्दिष्टापैकी फक्त अठरा टक्के कर्ज वाटप केले होते व बाकीच्या कर्ज इच्छुकांच्या तोंडाला पाने पुसली होती. एका चर्चेत बँकेच्या अधिका-याने सांगितले की बँकेत ठेवलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचा असतो व तो असा कुणालाही वाटता येत नाही. या बुध्दीवान अधिका-यांची अक्कल विजय मल्ल्यासारख्या पाच लाख कोटींचे कर्ज बुडवणा-यांना कर्जे देण्यावेळी कुठे गेली होती हे मात्र कळू शकलेले नाही.
          आज शेतक-यांच्या पतपुरवठ्याची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. बहुतांशी शेतक-यांचे सातबारे कोरे नसल्याने राष्ट्रीकृत बँका त्यांना उभे करीत नाहीत. नाबार्डवर कृषि पतपुरवठ्याची जबाबदारी असली तरी ज्या सहकारी जाळ्यातून हा पतपुरवठा केला जातो ती व्यवस्था भ्रष्टाचारी राजकारणामुळे मरणासन्न अवस्थेत गेली असून सा-या जिल्हा सहकारी बँका, त्यांची शिखर बँक व गाव पातळीवरच्या विविध कार्यकारी सोसायट्या या डबघाईला आल्याअसून ग्रामीण पतपुरवठा ठप्प झाला आहे. खासगी सावकारी अशा वातावरणातच फोफावत असते व त्यांना राजकीय पाठबळ मिळत शेतक-यांच्या जमीनी हडप करण्याची कटकारस्थाने वाढीला लागली आहेत.
          देशपातळीवर जसा राष्ट्रीकृत बँकात कार्पोरेटस् नी धुमाकूळ घातला आहे तेवढाच सरस धुमाकूळ राज्य पातळीवर सहकारानी कृषि पतपुरवठ्यात घातला आहे. सत्तेत असलेल्यांनी आपल्याच सहकारी संस्थांना कृषिसाठी असलेल्या तरतुदींचा गैरवापर करत अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आपल्या खिषात घातले आहेत. आज सा-या सहकारी बँका, प्रक्रिया उद्योग वा व्यापारी संस्था या अवसायानात निघत असून सर्वसामान्य शेतक-यांच्या वाट्याचे करोडो रूपये पाण्यात गेले आहेत. या सहकारी संस्थांमध्ये शेतक-यांनी आपल्या उज्वल भवितव्याची स्वप्ने पहात आपले किडूक मिडूक विकून भरलेले भागभांडवल बुडीत खाते जमा झाले असून शेतकरी वगळता सा-यांच्या बुडलेल्या पैशांची भरपाईची व्यवस्था सरकार करीत असते. शेतक-यांना उघड्या डोळ्यांनी झालेली आपली लूट पहाण्याशिवाय पर्याय नसतो.
          शेतक-यांच्या व पर्यायाने ग्रामीण भागाच्या या हलाखीचा विचार करता एकंदरीतच शेती, तिची धोरणे, कायदे व अमलबजावणीसाठी एक स्वतंत्र आयोग स्थापावा. शेतीसाठी दिली जाणारी आर्थिक तरतूद वा मदत या आयोगाकडे वर्ग करावी. आज शेतीचे तुकडे पाडत कुणाचीही जबाबदारी निश्चित न करणा-या विविध खात्यांचे एकत्रीकरण करावे व कृषिचा एक स्वतंत्र कायदाही करावा म्हणजे देशाच्या कृषिधोरणात एक कायमस्वरूपी सुसंगती व निश्चिती येऊ शकेल. शेतीला योग्य न्याय न देणा-या धोरणांची फलश्रुती आपण बघतच आहोत, त्यातील दरी अधिक वाढू नये यासाठीच्या प्रयत्नांसाठी ही योग्य वेळ आहे असे वाटते.
                                        डॉ. गिरधर पाटील girdhar.patil@gmail.com   9422263689.  

गुरुवार, १० मार्च, २०१६

जल्लोषामागची स्मशान-शांतता



        जल्लोषामागची स्मशान-शांतता
     खरे म्हणजे शांततेसाठी एवढा आरडाओरडा करायची काहीएक गरज नाही. शांतता व स्तब्धता ही निरवतेने येत असते व ती एक वैयक्तीक पातळीवरची अनुभूती आहे. ध्यान, धारणा याही वैयक्तीक पातळीवरच्या अनुभूती असून त्यात अनुस्युत असलेली मनाची एकाग्रता ही एकटेपणाशी जुळलेली आहे. खरे साधक डोंगरकपारीतल्या गुहांमध्ये जाऊन ध्यानधारणा करीत याचे दाखले पुराणात सापडतात. अशा सामुदाईक पध्दतीने ध्यानधारणा करण्याचा कुठेही प्रघात नाही, उलट ध्यानधारणेला बाधक ठरणा-या सामूहिकतेला त्याजून स्वतःला ओळखण्यासाठी अंतर्मुख होण्यालाच महत्व दिले जाते. यात मानसिक एकटेपणा (Isolation) बरोबर शारिरिक एकटेपणही तेवढेच महत्वाचे आहे. आता दिल्लीत जो जागतिक शांततेच्या नावाने जो जल्लोष होतो आहे त्याचे अनेक पदर आहेत व देशातील वातावरण ज्या धर्म-जात-परंपरांच्या नावाने ढवळले जात आहे त्याचा विचार देशाच्या राजकीय-सामाजिक-आर्थिक अवस्थेशी वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून होणे गरजेचे आहे कारण देशातील एक मोठा शोषितांचा वर्ग अशा घडामोडींतून भरडला जात असतो व त्याच्या उध्दाराच्या शक्यता क्षीण होत अशा बेगडी व समारंभी कार्यक्रमातून जीवनाला ख-या अर्थाने स्पर्शणा-या उपाययोजनाही परिघाबाहेरच ठेवल्या जातात.
 हा कार्यक्रम धर्मसत्ता व राजसत्ता या आजवरच्या इतिहासात एकमेकांना पूरक ठरत आलेल्या परंपरांतील एक आहे. धर्माने राज्यसत्तेला वैधानिक वा तथाकथित नैतिक अधिष्ठान देत राज्याला पुष्ट करीत रहायचे व त्याबदल्यात राज्यसत्तेने धर्माच्या गतविधींना संरक्षण देत तो बळकट करायचे असा हा साधासुधा व्यवहार आहे. या दोघांचा उद्देश सर्वसामान्यांवर सत्ता गाजवणे हाच असतो व या सत्तेच्या मुळाशी शोषणाचा स्वार्थ असतो हेही लपून राहिलेले नाही. स्वतःला साधुसंत म्हणवून घेणा-यांनी हा कार्यक्रम केवळ स्वबळावर केला असता तर लोकशाही देशात त्याला हरकत घेण्याचे कुणाला काही कारण नाही. मात्र ज्या देशाच्या घटनेत धर्मनिरपेक्षतेला महत्व देत सर्वधर्मसमभाव हा नागरिकांच्या सहजीवनाचा मुख्य गाभा असल्याचे नमूद केले आहे त्या देशातल्या सरकारांनी आपली वैधानिक कर्तव्ये वा जबाबदा-या पार पाडण्यात कसूर करत देशातील सांमजस्यालाच धक्का लावण्याचे काम करू नये. हाज यात्रेला सरकारने आर्थिक मदत देणे जेवढे गैरलागू आहे तेवढेच गैरलागू कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक निधीचा वापरही आहे. मुख्यमंत्र्यांची सरकारी विठ्ठलपूजा जेवढी निरर्थक ठरते तेवढेच सरकारी खर्चाने होणा-या मंत्र्यांच्या व अधिका-यांच्या सहकुटूंब शिर्डी वा तिरूपतीच्या वा-याही ठरतात. या सा-यांना आपापल्या धार्मिक इच्छाआकांक्षा पूर्ण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे व तो आपल्या स्वकष्टार्जित कमाईतून केला तरच धार्मिक ठरतो. हा धर्म ज्यांना समजत नसेल त्यांनी जगाला धर्म शिकवण्याची भाषा करणे यासारखा विरोधाभास नाही.
स्वामी धीरेंद्र ब्रम्हचारी, चंद्रास्वामी आणि आताचे आसारामबापू या सा-यांची कारकिर्द व कारनामे संशयास्पद राहिले आहेत. सत्तेतील त्यांचा वावर बघता सत्तेला धर्म शिकवण्यापेक्षा सत्ता आपल्या सोईसाठी कशी वापरता येईल अशीच त्यांची प्रकरणे आहेत. सुश्री हे ज्या पोट भरलेल्यांना जीवन जगण्याची कला शिकवतात तेही मागच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा प्रचार करीत होते असे सोशल मिडियात प्रसिध्द होऊ लागले आहे. अशा या परोपकाराची परतफेड सत्ताधारी पक्षाने केली असती तर तो धर्म ठरला असता. मात्र या देशावर ज्या घटकांचा वैधानिक अधिकार आहे तो डावलत सार्वजनिक निधी वा मालमत्तेचा अगदी सैन्यासकट गैरवापर करत मनमानी चालली आहे ही देशातील गुण्यागोविंदाने नांदणा-या सर्वधर्मी धर्मनिरपेक्ष जनतेच्या अगोदरच्याच जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. मेक इन इंडियाचा फियास्को सा-या जगाने बघितला आहे. करारात नमूद केलेली रक्कम जणू खरोखरच देशात आली आहे असे भासवत सत्ताधारी स्वतःच स्वतःची पाठ थोपटण्यात धन्यता मानीत आहेत.
ही सारी मांडणी करण्यामागे भारतातील पासष्ट टक्क्यांने असणा-या शेतक-यांच्या भीषण अवस्थेची झालर आहे. जगण्याची कला तर सोडा, साधे जगणेही अशक्य झालेल्या या समाजघटकाला घटनेने प्राप्त अधिकारही या देशातील सरकार ज्यावेळी देऊ शकत नाही, त्या देशाने सा-या जगाला जगद् गुरू होत शांती सुखसमाधानाचे धडे द्यावेत यापेक्षा विरोधाभास कुठे नसेल. तसे पहायला गेले तर सारा मानव जातीचा इतिहास हा शेतीतल्या बचतीच्या लुटीचा इतिहास आहे. सारी युध्दे वा लढाया या लुटीच्या वाटपातून झालेल्या आहेत. आजच्या सरकारांचा बुरखा तेवढा भीषण वाटत नसला तरी एकंदरीत कर्तृत्व बघता आजही हा मूळ गाभा कायम आहे. खरे म्हणजे सत्तेत प्राबल्य हवे ते उत्पादक वा पोशिंद्यांचे, ते तसे न रहाता मागचे सरकार दलालांचे तर हे सरकार व्यापा-यांचे. उत्पादक घटक ज्यात शेतकरी महत्वाचा मानला जातो त्याची आजची अवस्था बघता सरकार या व्यवस्थेचे प्रयोजन, आयोजन, नियोजन सारेच चूकीच्या दिशेने जात भरकटल्यासारखे वाटते. देशावर परिणाम करणारी ध्येयधोरणे न बदलता अमुक एक धर्माचा देश झाला म्हणजे रामराज्य (?) नांदेल अशा भ्रामक कल्पनेत वावरण्यांनी समस्त देशाची घोर निराशा केली आहे. राहिला प्रश्न या कार्यक्रमाच्या भव्यतेचा. अशी प्रकारची भव्यता ही नेहमी सामान्यांना घाबरवत दडपून टाकण्यासाठी वापरली जाते. या भव्यतेपुढे तुम्ही कोणी क्षुद्र आहात व आम्हाला विरोध न करता नतमस्तक होणे हेच तुमच्या हिताचे आहे असाही नकळत संदेश देण्याचा प्रयत्न असतो.
मुळात हे सरकार खरी परिक्षा न देता अगोदरच्या सरकारच्या नाकर्तेपणा, त्यामुळे जनतेला आलेले नैराश्य या नकारात्मक भावनेतून एक उपलब्ध पर्याय या अपरिहार्यतेतून सत्तेत आले आहे. त्याचा अर्थ त्यांनी भलताच घेतलेला दिसतो. हा आमच्या विचाराचा, क्षमतांचा व सिध्द झालेल्या संकल्पनांचा विजय आहे असे समजत वास्तवापासून दूर जात या देशाला न मानवणारे अघोरी उपाय त्यांनी अंगिकारले आहेत. सत्य हा कुठल्याही धर्माचा पाया असतो. तो न पाळणारे अधार्मिक ठरतात. सत्तेवर येण्यासाठी यांनी जे मार्ग अवलंबले ते बघता कुठला धर्म हे या देशाला व जगाला शिकवणार ?  याची अनेक उदाहरणे असली तरी अगदी बटबटीतपणे पुढे आलेले साधे उदाहरण म्हणजे निवडून येण्यासाठी दिलेल्या खोट्या आश्वासनांचे. शेतक-यांच्या जीवाभावाचा असलेल्या शेतमाल भावाचा प्रश्न स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारून सोडवू या आश्वासनाचा वापर करण्याचा धर्म नाकारत निवडून आल्यावर तसे भाव आम्हाला देता येत नाहीत याबद्दल शेतक-यांची जाहीर माफी मागणे हाही धर्म ठरला असता, तो न पाळता तो निवडणूक मामला होता असे म्हणण्यासारखा अधर्म नाही. आजवर जगाचे पोट भरण्यात धन्यता मानणा-या शेतक-यांचा धर्म हाच खरा व अंतिम धर्म असतांना अशा भ्रामक व दिशाभूल करणा-या कार्यक्रमांकडे दूर्लक्ष करणे हेच आपल्या हाती उरते !!
                           डॉ. गिरधर पाटील. Girdhar.patil@gmail.com. 9422263689.