आर्थिक घडी व सामाजिक तेढ.
एकाद्या रूग्णाने बरे होण्यासाठी कितीही
योग्य वा रामबाण उपाय शोधून काढला तरी त्याला आपल्या सोईच्या वैदूकडे नेण्याचा
प्रयत्न हा त्याला बरे करण्याऐवजी त्याच्या आजाराची गंभीरता वाढवण्याचीच शक्यता
असते. आपल्या वंचितांच्या सा-या समस्यांबाबत असेच काहीसे घडते आहे. मराठा काय वा
इतर वंचित घटक काय आपल्या मागण्या अधोरेखित करतांना त्या आर्थिक स्वरूपाच्या
असल्याचे स्पष्ट होऊनही त्या मात्र सामाजिक कारणांमुळे आहेत असे भासवत त्यावरची
उपाय योजनाही सामाजिक स्वरूपाची ठेवत या घटकांच्या हाती फारसे काही न लागू देता
त्याच्या पदरात एक नवा अनुभव पाडण्याखेरीज दुसरे काही घडणार नाही. आज या सा-या
वंचित समाजांमध्ये जो काही उद्रेक उफाळून आला आहे त्याला आरक्षणासारखे कारण
असल्याचे भासवत सा-या आरक्षित घटकांमध्ये असुरक्षितता निर्माण करत कुणाला काही मिळण्या
वा गमावण्याऐवजी आजच त्यांच्यात संघर्षाचे वातावरण तयार केले जात आहे. मराठ्यांच्या
महाकाय मोर्चाची कारणमीमांसा करतांना ज्या पध्दतीने केवळ आरक्षणामुळेच त्यांचे
सारे प्रश्न सुटतील असे वातावरण सुरवातीलाच केले असले तरी खुद्द याच समाजात या
निमित्ताने जे काही विचारमंथन होत आहे त्यातून अनेक नव्या गोष्टी बाहेर येत न्या.
पी. बी. सावंतासारख्या विचारवंतानी या मागण्यांचा आलेख सखोल व व्यापक केला आहे.
आरक्षणाचा उल्लेख वास्तविक पातळीवर
करताच आपल्याला आरक्षण नाकारले जाते अशी भावना होत असते. मात्र त्यातल्या काल्पनिक
नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक वास्तविकता कोणी लक्षात घेत नाही. आरक्षण मिळण्यातील
व्यावहारिक अडचणी वा त्याला लागणारा काळ हा काही तमाम मराठ्यांच्या आजच्या
हलाखीवरचा ताबडतोबीचा व सर्वसमावेशक उपाय होऊ शकत नाही. ते कसे कुठून मिळेल हेही
अजून निश्चित झालेले नाही. त्यावरच्या काही शक्यता मात्र व्यक्त होत असतात. मुळात
ते देऊ शकणा-या राजकीय व्यवस्थेचा पूर्वानुभव बघता ते कितपत विश्वासपात्र आहे हेही
सांगता येत नाही. त्यातला एक धागा पकडत आपल्या आरक्षणावर कुणाचे अतिक्रमण होते का
या भितीने मात्र आता प्रतिमोर्चे निघत असून तसे आजवर एकत्र नांदत आलेल्या समाजात
तेढ निर्माण करण्याचे काम, जे आजच्या राजकीय व्यवस्थेला आपल्या सत्ताकारणासाठी
हवेच आहे, होऊ घातले आहे. म्हणजे या सा-या घटकांच्या राजकीय गैरवापराच्याच सा-या
शक्यता दिसत असून त्यावर सामाजिक समतोल न ढासळू देता सम्यक मार्ग निघणे आवश्यक
आहे.
एकाद्या जनसमुदायाच्या सामूहिक
वाटचालीतून त्याच्या व्यावसाईक, सांस्कृतिक कारणांमुळे काही समान कारणांमुळे
त्यांच्यात असमानतेची, विषमतेची वा वंचिततेची भावना जाणवत असेल तर त्या
निवारण्यासाठी त्या समाजाने एकत्र येण्यासाठी जात हा घटक महत्वाची भूमिका बजावू
शकतो. या समान भावनेचे उफाळून येणे हे नुकत्याच होत असलेल्या मराठा समाजाच्या
मोर्च्यातून दिसून आले आहे. मात्र या समुदायाने या निमित्ताने जात या निकषावर आपला
स्वतःचा वेगळा कोष वा वेगळी चूल न मांडता सर्वसमावेशक प्रवाहाचा एक भाग होत
आपल्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या एकत्र येणाच्या प्रक्रियेतून सामूहिक
व सामाजिक सक्षमीकरणाची भावना वाढीस लागतेच व समस्यांची उकल करण्याचे अनेक मार्ग
विचारमंथनातून निघू शकतात. न्या. सावंतांनी यावर टिपणी करतांना ज्या समाजाला
आरक्षणाची गरजच भासणार नाही अशा समाजनिर्मितीचे उद्दिष्ट आपण ठेवले पाहिजे यावर भर
दिला आहे.
मराठ्यांच्या या सामाजिक उद्रेकाचे
सुत्रसंचालन राजकीय व्यासपीठावरून काहीही होत असले तरी सामाजिक पातळीवर आपल्या
समस्यांच्या स्वरूपाकडे या समाजाने डोळसपणे बघायला सुरूवात केली आहे. सुरूवातीला
समावेश नसलेल्या ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेल्या शेतीचा समावेश नंतरच्या
मागण्यात होऊ लागला आहे. शेतमाल भावाचे प्रश्न वा शेतीतल्या निश्चित उत्पन्नाचे
स्त्रोत याचाही उल्लेख होऊ लागला आहे. शिक्षण क्षेत्रात नेमके काय चालले आहे याचा
शोध घेत आपल्या या क्षेत्रातील वंचितपणाची कारणे शोधली जात आहेत. आपल्याच समाजातील
विद्यार्थ्यांना ताबडतोबीने काय मदत करता येईल याचे प्रयत्न सोशल मिडियातून प्रकट
होऊ लागले आहेत. त्यासाठीचा निधी संकलन व समाजाने दिलेल्या देणग्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे वा स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन यासाठीचे प्रयत्न
दिसू लागले आहेत. एकूणच एका सामाजिक सलोख्याचे नवे पर्व या उद्रेकातून सुरू होत
असेल तर या सा-या प्रयत्नांच्या आधारे एकूणच हा समाज स्वावलंबी होत आपल्या समस्या
निवारण्याचे काम स्वतःच हाती घेऊ शकतो.
या सा-या समस्यांचे व्यवस्थित सामाजिक
प्रबोधन होणे आवश्यक आहे. समाजातील सा-या घटकांना यातले बारकावे वा खाचाखोचा अवगत
असतीलच असे नाही. बराचसा समूह हा भावनिक स्तरावर विचार करत असतो. आपल्या
वंचितपणाचे ते एक प्रमुख कारण आहे हेही लक्षात घ्यायला हवे. आपण शोषणप्रवण आहोत
कळणे हे एक प्रकारे गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्यासारखे आहे, कुठलाही
अभिनिवेष न बाळगता काही वास्तविकता आपण स्विकारल्या तरच त्यातून मार्ग शोधणे शक्य
होईल. परवा लातूरच्या शेतकरी असणा-या एका विधवा स्त्रीचा फोन होता की तिची मुलगी
साता-याला शिकत असून तिची सात हजार रुपये फी भरली नाही तर तिला अभ्यासक्रम अपुरा
ठेऊन घरी यावे लागेल. यावर तिला आपण काय दिलासा देणार ? ती तर या व्यवस्थेची नकळत ठरलेली बळी आहे व
स्वतःलाच दोष देत आक्रोश करते आहे. अशा या सा-या समस्यांवर एक समाज म्हणून
आपल्याला सा-यांना विचार करावा लागेल. समाजातील आहेरेंनी नाहीरेंना हात देत वर
उचलले पाहिजे. किंबहूना या मोर्च्यातच या आहेरेंचा तसा उल्लेख होत त्यांना दूषणेही
दिली जात आहेत. हा सारा सामाजिक वाटचालीचा एक टप्पा समजत आता यातून काय सकारात्मक
मार्ग काढता येतो हे महत्वाचे आहे. या आहेरेंमधील काही संवेदनशील घटक आजच पुढे
यायला लागले असून ज्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे अशांना तर आपल्या परिमार्जनाची
यापेक्षा चांगली संधी काय असू शकेल ? आपल्यातील हरवलेल्या
सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलतेचा शोध घेत सध्या एक जाती समूह म्हणून जरी यातून
मार्ग काढू शकलो तर सा-या समाजाच्या हिताचे ठरू शकेल.
डॉ. गिरधर पाटील 9422263689.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा