रविवार, ३ एप्रिल, २०१६

अस्मिता की अस्तित्व ?



                 अस्मिता की अस्तित्व ?
जगण्याच्या ज्या मूळ पूर्वअटी असतात त्यात जगणा-याचं अस्तित्व ही एक अपरिहार्य बाब असते. कारण अस्तित्वच नसेल तर जगणे शक्य होत नाही. एकदा अस्तित्व निश्चित झाले की मग सुरू होतात या जगण्याच्या भावनिक स्तराची काळजी घेणा-या रितीभाती वा पध्दती. ज्यांना आजकाल अस्मिता असे म्हटले जाते. या अस्मितांच्या मदतीने नुसते जगणेच नव्हे तर जगणारा मी कोण आहे हे ठरवत व ते जगणे अधोरेखित करीत जगत असतो. उदाहरणार्थ भूक ही एक मूलभूत गरज आहे. ती भागवणे ही अस्तित्वाची एक महत्वाची गरज आहे. आपल्या प्रयत्नांनी भूकेची एकदा निश्चिंती झाली की सुरू होतात भूकेच्या अस्मिता. म्हणजे जेवणात काय असावे, त्याचे ताट कसे असावे, पाटावर बसायचे की टेबलवर, एवढेच नव्हे तर जेवणानंतर पान हवे की बडीशोप अशा अस्मितांचा प्रांत सुरू होतो. अर्थात त्याने जगण्याची रंगत वाढत असली तरी अस्तित्वाचे मूळ प्रश्न व अस्मितांचा प्रांत यांची सरमिसळ होऊन अस्मिता वरचढ होऊ लागल्या की अस्तित्वाच्या प्रश्नांनाच धक्का लागतो व अस्तित्वाच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा ठाकतो. अस्तित्वच नसेल तर अस्मितांना काय अर्थ नसतो हे समजण्याइतपत काही वेळा या अस्मितांचे अतिक्रमण झालेले दिसते.
आजचा शेतकरी समाज नेमक्या याच कोंडीत सापडलेला दिसतो. एकवेळ अस्मिता या अपरिहार्य असल्याचे मान्य केले तरी त्या कुठल्या व कशाप्रकारच्या असाव्यात याची निवड चूकल्याने आजच्या ग्रामीण जीवनाच्या सा-या अस्मिता या शेतीपेक्षा अन्य क्षेत्राशीच जुळत गेल्याने शेतीतील त्याचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे दिसते आहे. मानसशास्त्रानुसार अशा अस्मिता या एकाद्या जनसमुदायात पेरता येतात व त्यांचे भावनिक स्तरावरचे उद्दिपन हे काहींच्या स्वार्थी इप्सितांचे बळी ठरू शकते. ही एक दिर्घ प्रक्रिया असते व भाबड्या जनसमुहांचे सारे मानसिक विश्व व्यापत त्यांचे विचार वा वर्तन बाघित करता येऊ शकते. आज सारा शेतकरी समाज अशा निरर्थक अस्मितांचा बळी ठरत स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत आहे व आपल्या उपजिविकेच्या साधन वा पध्दतीची प्रतारणा करत आपल्या अस्तित्वावरच उठलेला दिसतो आहे.
शेतक-यांच्या दृष्टीने आवश्यक असणा-या अस्मिता या शेतीशीच जुळणा-या असत्या तर आज या समाजाचे चित्र फार वेगळे दिसले असते. आजच्या ज्या अस्मिता तो कुरवाळतो आहे त्या एकतर धार्मिक, जातीय, ऐतिहासिक वा प्रचलित पक्षीय राजकारणाशी जुळलेल्या दिसतात. शेतकरी जीवनातील धार्मिक अस्मिता या इतर धर्माचा द्वेष यापेक्षा एकाद्या धर्माच्या अतिआहारी जाण्याशी निगडीत आहेत. शेती ही आजवर नैसर्गिक संसाधनावर अवलंबून असल्याने त्यामुळे येणारी अनिश्चितता व असुरक्षितता ही त्याला धर्म ही आपला उध्दार करणारी शक्ती आहे असे दैववादी बनवण्यात कारणीभूत असल्याचे दिसते. आजवर हे एकवेळ क्षम्यही समजता येईल, मात्र विज्ञानवादी काळात जिथे निसर्गाची कोडी उलगडत त्यावर मात करता येऊ शकते हे अनेक ठिकाणी सिध्द झाले असतांना त्याच वा-या, तोच देवभोळेपणा, तीच कर्मकांडे, त्याच अघोरी प्रथा या कमी होण्याऐवजी वाढतच जाणार असतील तर काहीतरी कुठेतरी चूकते आहे हे लक्षात घेतले पाहिजे. साधा इस्त्राईल सारखा देश, जेथे वर्षातून फक्त दोन इंच पाऊस पडतो, मानवी प्रयत्न, शास्त्र व तंत्रज्ञानाच्या मदतीने युरोपचा सारा फळबाजार बळकावतो हे उदाहरण शेतक-यांच्या तरूण मुलांनी अभ्यासायला हरकत नाही. अशाच त-हेचे अनेक प्रयोग आपल्याकडेही अनेक तरूणतरूणी करीत अडचणींवर मात करण्यात यशस्वी होत असल्याचेही दिसते आहे. आजच्या जीवनाचा मंत्र हा दैववादी धर्मवादी नसून प्रयत्नवादी विज्ञानवादी असल्याचे सा-यांनी लक्षात घेत आपली जीवनपध्दती सुधारली पाहिजे.
आपल्या जातीय अस्मिताही अलिकडे फार तीक्ष्ण होत जातील अशी काळजी घेतली जात आहे. ज्यांनी बारा बलुतेदारांची ग्रामीण संस्कृती पाहिली वा अनुभवली आहे, त्या पिढीला हे पटू शकेल. या संस्कृतीत वेगवेगळी कला व कौशल्य हस्तगत केलेली विविध व्यावसाईक मंडळी गावात अत्यंत एकोप्याने रहात. आपण इतरांपेक्षा सरस आहोत वा कनिष्ठ आहोत अशी भावना कधी कुणाच्या मनात येत नसे. शेतक-याच्या दारी आलेला प्रत्येक बलुतेदार आपल्या वाटेहिस्सा घेत आनंदाने आपला जीवनगाडा हाकीत असे. अर्थात शोषणाचा भाग त्याकाळीही असला तरी त्याचा जातीपातीशी काही संबंध नसल्याचे दिसून येईल. आज सर्वच जातींत एक सुरक्षिततेची भावना पसरल्याने एक व्हा नाहीतर आपले काही खरे नाही या विचाराने जातीजातीतल्या भिंती अधिकच उंच होत त्यांच्या सहभागी संबंधातही अंतर पडत चालले आहे. ही विभागणी ग्रामीण जीवनाचा विकासासाठी आवश्यक असणा-या एकोप्यालाच छेद देत असल्याने गटातटाच्या राजकारणाला खतपाणी घालणारे ठरत आहे.
या दुभंगलेल्या जनसमूहाचा चपखलतेने पक्षीय राजकारणासाठी वापर केला जातो. ज्या समूहांना पक्षाची ध्येयधोरणे माहित नसली तरी चालते परंतु अमुक पक्ष कुठल्या जातीला कुरवाळणारा आहे हे माहित झाले की व्यापक सार्वजनिक हितापेक्षा मी, माझी जात, आमची सत्ता (जिचा प्रत्यक्षात या पाठिराख्यांना कधीच फायदा होत नाही) या भ्रामक अस्मितांभोवती गावचे राजकारण फिरत रहाते व लोकशाहीला अपेक्षित असणा-या जनसहभागाचा फायदा गावपातळीवर तसा कुणाला  होणे अशक्यप्राय होऊन बसते.
खरं म्हणजे तुम्ही कोणत्या टोळीत रहावे यासाठी या अस्मितांची आखणी केली जाते. यामागे आजच्या राजकीय संस्कृतीतील निवडणुकांचे म्हणजे मतांचे राजकारण असते. हे राजकारण ज्याला जमते तो निवडून येतो व सत्ताही प्राप्त करतो. म्हणजे आपली अस्मिता ही दुस-या कोणातरीसाठी वापरली जात असल्याचे दिसून येईल. यातून जातीपातीचे मतदारसंघ तयार होतात, अमुक पक्षाचा वा जातीचा बालेकिल्ला असे नामोनिधान होत जातीधर्माच्या भिंती पक्क्या करत प्रसंगी तेढ निर्माण करून अस्मिता दुखावल्याच्या निमित्ताने दंगली घडवत आपापले राजकारण रेटले जाते. आजच्या लोकशाहीत आलेली ही एक विकृती आहे व शेतक-यांनी या पक्षीय राजकारणाच्या सापळ्यात न अडकता शेतीला प्राधान्य व महत्व देणा-या शक्ती ओळखत त्यांना राजकीय बळ देणे आवश्यक आहे. ही निवड तशी कठीण असली तरी आज पक्षीय राजकारण नाकारणे हा सोपा पर्याय वापरता येऊ शकतो.
कुठल्याही समाजात धर्मांधता, जातीय तेढ, सण उन्माद, उत्सवप्रियता या दिखाऊ प्रवृत्तींचा वाढता प्रभाव दिसू लागतो तो समाज आजारी असून सामाजिक नैराश्याने ग्रासलेला आहे असे समजावे. आजचे सारे प्रगत समाज हे विज्ञानवादी, वस्तुनिष्ठ व्यवहारवादी, न्याय्य धोरणे यांची कास धरल्यानेच आपला उध्दार करू शकले आहेत. जराशी फुंकर मारताच दुखावल्या जाणा-या अस्मिता व त्यापोटी मी कोण, माझा व्यवसाय काय याचा विचार न करता झाकून देणारे, लाठ्याकाठ्या खाऊन देखील माझ्यावर आत्महत्येचीच पाळी येणार असेल तर या सा-या तथाकथित अस्मितांचा पुनर्विचार करत माझ्या जीवनाची नवीन आखणी करण्याची वेळ आली आहे एवढेच या निमित्ताने !!
                                डॉ. गिरधर पाटील girdhar.patil@gmail.com 9422263689

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा