शनिवार, ३० एप्रिल, २०१६

सरकारची न शिजणारी डाळ



                  सरकारची न शिजणारी डाळ
          सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने राज्य वा देशातील नव्या सरकारांमुळे राज्यकारभारात फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. एकंदरीतच नव्या सरकारचा कारभार अनेक कारणांनी गाजतोय. जनतेचा साधारण अपेक्षाभंग हा तर महत्वाचा मुद्दा आहेच, परंतु या कारभाराबाबत प्रश्न उभे करत न्यायालयांनीही सरकारच्या कार्यक्षमता वा उद्देश याबद्दल कडक ताशेरे ओढत सरकारला आपल्या निर्णयांचा फेरविचार करण्यास भाग पाडले आहे. देशातील संविधान व त्यामुळे नागरिकांना मिळालेल्या मूलभूत अधिकारांची पाठराखण प्रचलित कायद्यांप्रमाणे अबाधित ठेवण्याचे काम न्यायालयांना करावे लागत असल्याने सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाबाबत आताशा भिती व संशयाचे वातावरण तयार होऊ लागले आहे. मुंबईतील बार बालांच्या प्रकरणात सरकारने राणा भीमदेवी थाटात अनेक घोषणा करत नवा कायदा आणला तरी न्यायालयीन कसोट्यांवर तो टिकू शकला नाही. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या सरकारच्या मनसुब्यालाही न्यायालयानेच कातर लावली. याचाच दुसरा अर्थ असाही होतो की सरकार म्हणून तुम्हाला मनमानी करून कारभार करता येणार नाही. प्राप्त संविधान, कायदे व प्रशासकीय चौकटीतच राहून त्यांचा सारासार अभ्यास करून निर्णय घेतले तरच ते जनतेच्या दृष्टीने हिताचे ठरतील असे न्यायालयांना अभिप्रेत असावे. आताही डाळींच्या बाबतीतही सरकारने जो नवा कायदा प्रस्तावित केला आहे त्याबाबतही असेच काहीसे व्हायची शक्यता आहे. कारण एकंदरीतच देशातील अर्थ व बाजार व्यवस्थेची दिशा, डाळींचे बाजार वास्तव, देशाची शेतमाल बाजाराची बदलती धोरणे व जागतिक व्यापार संस्थेची बंधने यांचा विचार करता भाव वाढण्याची खरी कारणे काय त्याचा सपक अभ्यास न करता भावनिक असा कायदा कितपत परिणामकारक ठरू शकतो याबाबत सरकारचा हा कायदा न्यायालयात फारसा टिकाव धरेल असे वाटत नाही.
          पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारने जीवनावश्यक कायद्यातील एका कलमान्वये डाळींचे भाव निश्चित करण्याचे ठरवले आहे. हा कायदा तसा केंद्राचा असल्याने एकाद्या राज्याला आपल्या राज्यात तशी तरतूद करायची असल्यास केंद्रिय कायद्यातही तसे बदल करावे लागतील. परत हा कायदा घटनेच्या परिशिष्ठ नऊमध्ये समाविष्ट केला असल्याने त्यातील बदल हे घटना दुरूस्तीशिवाय होऊ शकतात का हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा भेदभावाचा. जो जकात हटवण्याच्या बाबतीत व्यापारी नेहमी करायचे तो दरातील फरकामुळे होणा-या व्यापारावरील परिणामांचा. म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला एक दर व इतर राज्यातील जनतेला दुसरा दर. हा मुळातच घटनेच्या भेदभावाच्या कलमाशी निगडित असल्याने देशातील जनतेच्या समन्यायाच्या अधिकारावर गदा आणणारा ठरेल. असे करायचे झाल्यास साठ्यांबरोबर डाळींची आंतरराज्यीय वाहतूकही नियंत्रित करावी लागेल. मुख्य म्हणजे केंद्र सरकार देशात संपूर्ण एकल असा शेतमाल निर्माण करण्याची धोरणे आखून सारा शेतमाल बाजारच एका समान सुत्रात बांधू इच्छिते, त्याच्या विरोधात जाणारा हा कायदा आहे. एकाद्या राज्याला फूटून त्यातून आपला नवा बाजार थाटता येणार नाही. यातला दुसरा महत्वाचा मुद्दा सरकारचे दर जाहीर झाल्यावर उपस्थित होईल तो पंतप्रधानांच्या शेतक-यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करणा-या महत्वाकांक्षी योजनेचा. शेतक-यांचे उत्पादनाचे दर अशा रितीने बांधून ठेवण्याचा प्रघात पडला तर शेतक-यांचे आहे तेच उत्पन्न कमी व्हायची शक्यता आहे. वाढणे तर दूरच.
          तसे पहायला गेले तर हा कायदा तसा डाळ उत्पादक शेतकरी, घाऊक व किरकोळ व्यापारी, प्रक्रिया उद्योग व उपभोक्ता ग्राहक या सा-यांना अडचणीत आणणारा आहे. ज्या मध्यमवर्गीय हिताचे कारण पुढे करत सरकार हे धोरण पुढे दामटते आहे, त्यांना ही डाळ स्वस्तात मिळण्याऐवजी मिळेल का नाही अशीच परिस्थिती तयार व्हायची शक्यता आहे. अशा निर्बंधांमुळे असलेली डाळ गायब होऊन काळ्याबाजारात जाईल व दारूबंदी असली तरी अधिकचे पैसे मोजायची तयारी असेल तर वाटेल तेवढी मिळते, तसेच डाळीच्या बाबतीतही होईल. डाळीच्या दरातील नियंत्रणाबरोबर भ्रष्टाचाराच्या अनेक संधि व नोकरशाहीच्या हातात नको ते अधिकार सोपवणारा आहे. उदाहरणार्थ, पोलिस उपनिरिक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी वा सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा कर्मचारी हे केव्हाही व्यापा-याच्या घरावर, दुकानावर, गोदामावर धाड टाकू शकतात. आपल्या प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कर्तृत्व व प्रामाणिकपणा जगजाहीर असल्याने त्यांना हे नवीन घबाड सापडल्याचा आनंद होईल. अर्थात अशा धाडींचे स्वरूप व परिणाम काय असतात हे सर्वापेक्षा आताच्या अन्नपुरवठा मंत्र्यांना चांगले माहित आहे. कारण अशा धाडींचा धाक दाखवत व चाळीस रुपयाने खरेदी केलेली डाळ अडीचशे रुपयानी विकण्याची परवानगी देत मागच्या डाळ घोटाळ्यात आठ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असा मुंबई ग्राहक पंचायतीने केलेला आरोप अजून जनता विसरलेली नाही. याच साठेबाज व्यापा-यांवर सरकारने लादलेले शंभर रुपये दराने डाळ विकण्याचे फर्मान कसे झिडकारले गेले हेही सर्वज्ञात आहे. शिवाय सरकारने डाळीच्या विक्रीचा दर शंभर रुपये हा कुठल्या निकषावर ठरवला हेही अज्ञातच आहे. एकप्रकारे शंभर रुपये दराला मान्यता मिळत  बाजारात अशी अर्थशास्त्रीय समर्थन नसलेली दर पातळी स्थिरावणे हे बाजाराच्या दृष्टीने योग्य नाही. मागील प्रकरणात सरकारने मारलेल्या कोलांटउड्या लक्षात घेतल्या तर सरकारला हे आव्हान पेलवेल की नाही याचीच शंका वाटते. त्यांनी त्यात टाकलेल्या अशा धाडी व कारवाया जर मॅनेज होणार असतील तर असे शेकडो कायदे केले तरी प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेला काही दिलासा मिळणार नाही.
          आता नव्या बदलत्या अर्थकाळात सारा बाजार व त्यातील संकल्पनाच बदलत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील सा-या व्याख्या आता बदलू घातल्या आहेत. घाऊक व किरकोळ व्यापारी हे ठरवणे सोपे आहे परंतु एकाद्या व्यापा-याची स्वतःची शेती आहे, त्याने आपल्या शेतीत घेतलेल्या डाळीचे उत्पन्न हे शेतकरी म्हणून धरणार की व्यापारी म्हणून याचा उलगडा होत नाही. कारण शेतकरी म्हणून त्याचा माल साठवायला सरकारच प्रोत्साहित करीत असते. कांद्याच्या बाबतीत कांदा साठवणूकीसाठी सरकारच अनुदान देत असते त्यामुळे डाळीच्या बाबतीत साठवणुकीचे नवे निकष ठरवावे लागतील. शेतमालाच्या विक्रीचे प्रमुख केंद्र असलेल्या बाजार समित्यांवर शेतमालाच्या साठवणूकीची जबाबदारी कायद्याने टाकलेली आहे. त्यांच्यातील साठ्यांचे काय करणार ?  केंद्राच्याच वखार कायद्यानुसार निर्देशित गोदामात शेतक-याला आपला माल ठेऊन त्याच्या किमतीतील काही रक्कम अग्रीम मिळण्याची सोय आहे. असे साठे हे काय धरले जातील ? केंद्राच्या नव्या धोरणामुळे करार शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. म्हणून करारातून पिकलेली डाळ ही कुठल्या पातळीवर शेतक-यांची वा व्यापा-याची ? कारण असे करार पूर्ण झाल्यावरच डाळीचा मालक निश्चित होईल. त्याचा पूर्णत्वाचा कालखंड हा डाळीच्या व्यापारचक्रापेक्षा वेगळा असू शकेल. आणि हा करारदार जर परदेशातील असेल तर त्याला ती डाळ परदेशात नेण्याबाबतचे काय निकष असतील हेही स्पष्ट नाही. डाळ ही प्रक्रियेनंतर बाजारात येते. शेतक-यांने आपले पिक प्रक्रियेसाठी पाठवल्यास ती डाळ परत येईपर्यंत तो साठा की काय हे कसे ठरवणार हेही निश्चित नाही. व्यापा-यांच्या बाबतीतही असेच होऊ शकते. प्रक्रिया उद्योगांची गोदामे व त्यातील साठे हे कसे ठरवणार हेही निश्चित करता येत नाही. म्हणजे साठा कशाला म्हणावे याची कायदेशीर परिभाषाच निश्चित नसतांना त्याबाबतची बंधने नागरिकांवर लादणे म्हणजे त्यांना भ्रष्ट लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या तोंडी दिल्यासारखे होणार आहे. एकंदरीत हे प्रकरण हाताळणा-या नोकरशाही व मंत्र्यांच्या हाती अशा प्रकरणांचे निर्णय करण्याचे अधिकार जातात व ते राबवण्यात काय गैरप्रकार होतात हे जगजाहीर आहे.
          यात आणखी एक हास्यास्पद व व्यापाराच्यात विरोधात जाणारे कलम आहे की आयात डाळ काहीही दराने आयात केली असली तरी ती राज्याने ठरवलेल्या भावातच विकावी लागेल. म्हणजे महाग डाळ आणून ती स्वस्तात विकावी असा अव्यापारेषु व्यापार कोणी करणार नाही म्हणजे राज्यापुरता आयात डाळींचा प्रश्न आपोआपच मिटला. म्हणजेच टंचाईच्या काळात नवीन पुरवठा न झाल्याने आहे त्याच डाळीवर भार पडल्याने ती बाजारातून गायब होत काळ्याबाजारात जाईल व सरकारचे नियंत्रण नसलेल्या अव्वाच्या सव्वा दरातच सर्वसामान्यांना घ्यावी लागेल हा धोकाही लक्षात घ्यावा लागेल. तसाच दुसरा एक भाग म्हणजे मोठी शहरे, महानगर पालिका व तालुका स्तरावर डाळींचे दर वेगवेगळे रहातील व राज्य सरकार ते निश्चित करील. आता महानगरांच्या हद्दीजवळची जी खेडी वा उपनगरे आहेत तेथील जनतेला वेगळे दर व प्रत्यक्ष शहरात रहाणा-या जनतेला वेगळे दर. यातून होणा-या अवैध वाहतूकीवर सरकारचे काय नियंत्रण असेल हे स्पष्ट नाही. असे हे त्रैराशिक त्रांगडे कसे टिकेल याचेही आश्चर्य वाटते. शिवाय असे हे ठरवले जाणारे दर कृषिमूल्य आयोगाच्या किमान हमी दराप्रमाणे ठरवले जातील की कसे हे निश्चित नाही. कृषिमूल्य आयोगाने ठरवलेले आजवरचे दर कमी असल्याबाबत शेतक-यांचे अनेक आक्षेप आहेत. त्यातील आकडेवारी व पध्दत हीच चूकीची असल्याचे आरोप आहेत. तेव्हा राज्य सरकार हेच दर प्रमाण मानणार की स्वतःची प्रणाली राबवणार हे यात स्पष्ट होत नाही. म्हणजे उत्पादन खर्च जमेस धरून त्यावर वाजवी नफा लावत सरकारने विक्रीची किंमत ठरवली तरी त्यातील गुणवत्तेमुळे पडणा-या दरातील तफावतींचा विचार झालेला दिसत नाही. वेगवेगळ्या भागातील पिकणा-या डाळींची गुणवत्ता व त्यांचे दर त्यानुसार ठरत असतात. ते प्रत्यक्ष घेणारा व विकणारा यापेक्षा दुसरा कोणी सक्षमतेने ठरवेल असे वाटत नाही. सरसकट सर्व गुणवत्तेच्या डाळी एकाच पारड्यात मोजत एकाच भावाने विकणे हे बाजार संकल्पनेच्या विरोधात म्हणजे उत्पादक व ग्राहक यांच्या विरोधात जाणारे आहे.
          आता देशात एकतल बाजाराच्या संकल्पनेनुसार सारा बाजार ऑनलाईन होत शेतमाल खरेदीच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण होणार आहे. आपला शेतमाल शेतकरी देशात कोणालाही विकू शकतील वा काणीही व्यापारी सदरचा शेतमाल कुठूनही खरेदी करू शकतील. या दर नियंत्रित केलेल्या राज्यातील डाळ खरेदीचे अधिकार इतर राज्यांना असतील की नाही कारण इतर राज्यांपेक्षा ही डाळ निश्चितच कमी दरात उपलब्ध होईल. अशा प्रकारे एकाद्या पिकाचे भाव निश्चित करणे म्हणजे शेतक-यांना जर काही मिळणार नसेल तो आपसूकच या पिकापासून लांब जाईल व डाळींची टंचाई वाढतच जाऊन सरकारला दरवर्षी असे नवेनवे कायदे करावे लागतील. महाराष्ट्रातील ग्राहकांना केवळ ते महाराष्ट्रात आहेत म्हणून ज्या दराने डाळ घ्यावी लागेल त्यापेक्षा कदाचित स्वस्त दरात शेजारच्या राज्यात मिळू शकेल. अशा आंतरराज्यीय निर्बंधांचे आजवरचे अनुभव फारसे चांगले नाहीत त्यामुळे अशा तस्करीवर सरकारला आणखी एक नवा कायदा करावा लागेल.
          याबाबत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भारत आता जागतिक व्यापार संस्थेचा सभासद आहे व त्याच्या करारानुसार एकाद्या राज्याला असे दर निश्चित करून सा-या व्यापारावर होणा-या परिणामासाठी जबाबदार धरून आक्षेप घेता येतील. त्याचे उत्तर केंद्र सरकारलाच द्यावे लागेल. त्यामुळे या करारातील अटींचा काही भंग होतो का हे बघावे लागेल.  
          या सा-या निर्बंधात एकाद्याने मात्र जर सरकारी दरापेक्षा कमी दरात डाळ विकली तर सरकार त्याच्यावर काय कारवाई करणार याबाबत काहीएक स्पष्टता नाही. सरकारला जनतेला डाळ स्वस्तच द्यायची असली तर खुल्या बाजारातून खरेदी करावी आपल्या नावाजलेल्या व कार्यक्षम समजल्या जाणा-या सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारा सा-यांना फुकट वाटावी. एकीकडे गॅसवरील अनुदानाचा भार कमी व्हावा म्हणून त्यावरील अनुदान सोडण्याचे आवाहन करायचे व त्याचवेळी पाचशे रुपयांचा मल्टिप्लेक्स सिनेमा व दोनशे रुपयांचे आईसक्रिम खाणा-या वर्गाची महाग डाळीची काळजी करायची यात निश्चितच काहीतरी काळेबेरे आहे ते आपण ओळखले पाहिजे. एकंदरीत आपल्याकडे राबवली जाणारी डाळबंदी ही दारूबंदी ज्या पध्दतीने राबवली जाते त्याच पध्दतीने राबवली जाण्याची शक्यता आहे. जनकल्याणाच्या नावाने योजना आणायच्या व त्यांच्यात पळवाटा ठेवत त्या भ्रष्टाचाराने पोखरून भलत्याच घटकांना लाभदायक करायचा पायंडा आताशा पडत चाललाय. अशा बिनबुडाच्या व अपारदर्शक उद्दिष्टांच्या सा-या योजनांना उत्पादक शेतकरी, व्यापारी, प्रक्रियाधारक व ग्राहकांनी सारे भेद विसरून विरोध केला पाहिजे नाहीतर आपल्या कुणाचीच डाळ शिजणार नाही हे लक्षात ठेवलेले बरे !!
                                                                        डॉ. गिरधर पाटील ९४२२२६३६८९  

रविवार, २४ एप्रिल, २०१६

दुष्काळी सरकार



            दुष्काळी सरकार
   दुष्काळ हा काही फक्त पावसाचाच नसतो. तो कल्पनांचा, प्रयत्नांचा, नियोजनाचा वा इच्छाशक्तीचाही असू शकतो. एवढेच नव्हे तर सरकारच्या एकंदरीत जबाबदा-या बघता आपल्या वैधानिक कर्तव्यातील अपयशाचा देखील असू शकतो. देशातील दुष्काळाबाबत सरकार या व्यवस्थेची जी काही प्रकटने जाहीर होताहेत ती केवळ दुष्काळाची आकडेवारी व त्यातील तपशील जाहीर करणारी आहेत. म्हणजे पाऊस किती कमी पडला, धरणातील पाण्याच्या पातळ्या, दुष्काळी भागातील टॅंकर्सची संख्या वगैरे वगैरे. या जाहीर केलेल्या माहितीचा दुसरा उद्देश हा दुष्काळ केवळ नैसर्गिक कारणांमुळेच आहे हे पटवून देण्याचा व त्यात सरकार या व्यवस्थेची जबाबदारी कशी नाही हाही असतोच. परंतु थोडा वास्तववादी व वस्तुनिष्ठ पध्दतीने विचार केल्यास हा व अगोदरचेही दुष्काळ हा केवळ व्यवस्था अपयशाचा भाग आहे हे सप्रमाण सिध्द करता येते. हे अपयश नियोजनाच्या बाबतीत लोकप्रतिनिधींचे व अंमलबजावणीच्या बाबतीतले प्रशासनाचे अशी विगतवारी असली तरी फसलेले नियोजन व अंमलबजावणीतील ढिसाळपणा यामुळे करोडोंचा निधी फस्त होऊन देखील दुष्काळ निवारण्याच्या बाबतीत तसूभरही फरक पडलेला नाही.
     स्वातंत्र्योत्तर काळातील मान्सूनचा अभ्यास करणारा एक व्यापक अहवाल नुकताच प्रसिध्द झाला आहे. त्याचे स्वरूप बघता कुठल्याही वर्षी शंभर टक्के अचूक असा पाऊस कुठेही झालेला नाही. सुमारे पस्तीस ते चाळीस टक्के भाग हा नेहमीच पावसाच्या दृष्टीने दूर्लक्षित असतो. त्यात कमीजास्त पावसाच्या जागा बदलतात येवढेच. यात काही भौगोलिक विभाग वारंवार दूर्लक्षित झाल्याने त्यांना कठीण पावसाचे प्रदेश म्हणून ओळखले जाते व त्याबाबतील कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज भासते. म्हणजे पर्जन्यमान कितीही चांगले असले तरी या प्रदेशांवर लक्ष केंद्रित करण्याची सरकारची जबाबदारी असतेच. आता हे कठीण पावसाचे प्रदेश निश्चित झाल्यानंतर गेल्या साठसत्तर वर्षांत त्यांच्या पाण्याच्या गरजांच्या बाबतीत काही सकारात्मक काम झाल्याचे दिसत नाही कारण आजही हे सारे प्रदेश तसेच तहानलेले दिसतात. म्हणजे मान्सूनच्या लहरीपणामुळे बाधित होणारे पस्तीस ते चाळीस टक्के भूभाग व हे कठीण प्रदेश असे कायमचे ओझे दुष्काळाच्या स्वरूपात भारतात दरवर्षी दिसून येते. म्हणजे मान्सून कसा का असेना ही एवढी जबाबदारी आपल्याला टाळताच येत नसल्याने सर्वच प्रदेशात किमान पिण्याच्या पाण्याची का होईना कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची जबाबदारी सरकार म्हणून या व्यवस्थेला टाळता येणार नाही.
     सिंचन व पाणीपुरवठा हे राज्याचे विषय असले तरी केंद्रिय अर्थसंकल्पात यासाठी भरघोस तरतुद केलेली असते. विशेष बाब म्हणून काही महत्वाकांक्षी व मोठ्या प्रकल्पांना इतर मदतींबरोबर केंद्र सरकार सढळ हाताने मदत करीत असते. आजही इंग्रजांच्या काळातील धरणांना दरवर्षीच्या डागडूजीचे अनुदान केंद्राकडून येत असते. यात भर म्हणून जागतिक बँकेच्या मदतीने जलस्वराज ग्रामीण पाणीपुरवठा योजना भारतातील दहा राज्यांमध्ये राबवली जाते. ही ग्रामीण पाणी पुरवठ्याची करोडो रुपयांची योजना पूर्ण होऊन देखील जागतिक बँकेने त्याच्या उपयुक्ततेबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या योजने अंतर्गत पूर्ण झालेल्या सहाशे ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा अभ्यास करण्यात आला. काही योजना या तांत्रिक दृष्ट्या असक्षम असल्याचे आढळून आले. या योजना चालवण्यात राज्य, जिल्हा वा पंचायत पातळीवर अनेक त्रुटी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विकेंद्रीकरणाच्या नावाने दूर्लक्ष झाल्याने या योजनांना आज कोणी वाली नाही. आज अशा योजनांचा ग्रामीण भागातील पेयजलाचा घरटी मासिक खर्च ऐक्यांशी रुपयांपर्यंत जाऊन पोहचला आहे. ग्रामीण जनतेची खर्च करण्याची क्षमता ही फक्त साठ रुपयांपर्यंत गृहित धरल्याने ब-याचशा योजना या न चालतांच बंद पडल्या आहेत. या योजना चालवण्यासाठी आवश्यक असणा-या व्यावहारिक मार्गांचा सरकार अजूनही शोध घेऊ शकलेले नाही असा जागतिक बँकेचा आक्षेप आहे. म्हणजे या योजना जर नियमितपणे सुरू राहिल्या असत्या तर आज एकदम कोरडीढाक पडण्याची जी आणीबाणी उद् भवली आहे ती आली नसती. आता गावाला करण्यात येणारा टँकरद्वारा पाणी पुरवठा गावात पाणी पुरवठा योजना असून देखील सरकारला जबाबदारी म्हणून काय भावाने द्यावा लागतो याचा मात्र व्यावहारिक विचार झालेला दिसत नाही. त्याच प्रमाणे मिरजेहून लातूरला रेल्वेद्वारा होणारा पाणी पुरवठा हा काय भावाने पडतो याचाही विचार सरकार कधी करत नाही. दरवर्षी वाढत जाणारी टँकर्सची संख्या, त्यात होणारा भ्रष्टाचार यातून सरकारला ही टँकर्सची व्यवस्थाच कायम ठेवायची असल्याचे अनुमान काढल्यास ते चूकीचे ठरायला नको.
            अशाही दुष्काळात आशेची काही हिरवी बेटे दिसतात, त्याकडे सरकार सहेतुक दूर्लक्ष करीत असल्याचे दिसते. याच दुष्काळी भागातील हिवरे बाजार, राळेगण सिध्दी, शिरपूर येथील पाणी जिरवण्याचे प्रयोग लक्षात घेता किमान खर्चात पाण्याची पातळी चांगली राखण्यात या गावांना यश आले आहे. पिण्याचेच पाणी नव्हे तर शेतीसाठीही पाणी देण्याइतपत या गांवांची सक्षमता वाढली आहे. पशुपक्षी जे ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग समजले जातात त्यांचीही काळजी आपोआपच घेतली जाते. सरकारच्या दृष्टीने या सा-या प्रयोगात एकच वाईट आहे ते म्हणजे यात सरकारी बाबूंना फारसे काम नाही, प्रशासकीय परवानग्यांचे व टेंडरचे लचांड नाही व सर्वांचे पोट भरणारी टक्केवारी हीही मोठी आर्थिक उलाढाल नसल्यामुळे आपोआपच नाहीशी होते, मग एवढा उपद् व्याप करायचा तो कशासाठी या कारणाने सरकार हे प्रयोग दूर्लक्षित करीत होते. नद्यांतील गाळ काढून त्यांच्या पात्राचे रुंदीकरण करणे हाही प्रयोग बिगरसरकारी नाम या संस्थेनेच केला. या संस्थेच्या आकडेवारीनुसार ज्या कामाला सरकारला पंचवीस कोटी लागले असते ते केवळ अडीच कोटीत करण्यात आले. मात्र या प्रयोगातील यश स्पष्ट झाल्यावर सरकारला जाग आली व या रुंदीकरणाचा समावेश शासकीय योजनांत करण्यात आला.
     या उलट वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख यासारखे महाराष्ट्राचे दिग्गज समजल्या जाणा-या नेत्यांच्या भागांत आजही दुष्काळी आणीबाणी निर्माण झाली असून सा-यांच्या मतदार संघात आजही टँकरने फक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. याचाच अर्थ हा दुष्काळ पाण्याचा नसून केवळ दूरदृष्टी, नियोजन व अंमलबजावणीचाच आहे हे लक्षात यायला हरकत नसावी.
                                 डॉ. गिरधर पाटील 9422263689.
    

मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

आंबेडकरी घटना व भारतीय शेती



      आंबेडकरी घटना व भारतीय शेती
   भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान कुणालाच नाकारता येणार नाही. नुकत्याच साज-या झालेल्या त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने ते परत एकदा नव्या पिढीसमोर आले आहे. बाबासाहेबांनी राष्ट्राला दिलेल्या घटनेचं आपण सारे किती कौतुक करतो. ही बाबासाहेबांनी देशासाठी दिलेली मूळ घटना आजही नॅशनल फिजिकल लॅबरोटरीच्या साह्याने अमेरिकेतील ग्रँटी काँझर्वेशन इन्स्टिट्यूटमध्ये नायट्रोजनने भरलेल्या कुपीत सीलबंद करून ठेवण्यात आली आहे. परंतु खुद्द भारतात आज उपयोगात असणारी घटना कितपत बाबासाहेबांची राहिली आहे व तिचा मूळ गाभा हरवत आजवर ९४ वेळा दुरुस्तीच्या नावाने केलेल्या बदलांबाबत मात्र कोणी फारसे गंभीर दिसत नाही. एवढी दुरदृष्टी ठेऊन तपशीलवार मांडणी केलेल्या घटनेत दोनचार वर्षातच दुरुस्ती करण्याची वेळ का यावी हेही कोणी अभ्यासत नाही.  शिवाय ज्या लोकसभेने ही घटना दुरुस्ती केली ती काही देशातून प्रातिनिधिक स्वरूपात निवडून आलेली लोकसभा नव्हती. ती एक वैधानिक निवडणुकांद्वारा सिध्द होणारी लोकसभा अस्तित्वात येईपर्यतची ती अस्थायी स्वरुपाची तात्कालिक सोय होती. या अस्थायी लोकसभेने विश्वस्थाची भूमिका घेत या बदलाचा खरा अधिकार असलेली लोकसभा येऊ द्या व तिला ठरवू द्या काय दुरुस्ती करायची ते असे म्हणायला हवे होते. परंतु त्यावेळच्या काही घटकांना या नवव्या परिशिष्ठाच्या स्वरूपात जी कलमं घुसडायची घाई झाली होती त्यामुळे नंतरच्या काळात देशाचा प्रमुख उद्योग असलेल्या शेतीची मात्र वाताहत झाली. यात शेतक-यांना मालमत्तेचा हक्क नाकारणे, त्यांच्या जमीन अधिग्रहणाचे एकतर्फी अधिकार सरकारला देणे, त्याचे बाजार व तंत्रज्ञान स्वातंत्र्य हिरावून घेणे व या सा-या अन्यायाच्या विरोधात त्याला न्यायालयात दाद मागण्याचाही अधिकार न ठेवणे अशा राक्षसी कलमांचा समावेश आहे. दुस-या पंचवार्षिक योजनेच्या प्रस्तावनेत आणि भारतीय खाद्यान्न महामंडळ कायदा 1962 या कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये शेतमालाच्या किंमती किमान पातळीवर ठेवण्याच्या धोरणाचा उल्लेख आहे. याच दरम्यान दुस-या महायुध्दाचे सावट असलेली अन्न पुरवठ्याची टंचाईची स्थिती नियंत्रित करण्यासाठी जीवनावश्यक वस्तुंचा कायदा इंग्रजांनी अध्यादेश काढून लागू केला होता. घटनेतील परिच्छेद 19 व परिच्छेद 31 मध्ये नागरिकांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या तरतुदीमुळे तो रद्द ठरण्याची भिती जाणवताच नागरिकांचे आर्थिक स्वातंत्र्य सिमित करण्यात आले. तसेच मुळ घटनेत भारतीय लोकशाहीत निवडणुका व पक्षीय राजकारण याचा काहीही उल्लेख नसतांना पक्षीय राजकारण स्थिरावल्यावर तसे बदल करण्यात आले.  आता हीच पध्दती निवडणूक सुधारात अडथळा ठरत असून देशात कुठलेही सकारात्मक सुधार अमलात येण्यात अडथळा ठरते आहे. देश वाचवायचा असेल मूळ आंबेडकरी घटनेची पुनर्स्थापना हा घटनाप्रेमींचा कार्यक्रम असायला हवा.
     या घटनेचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे या लोकशाहीतील सरकार नावाच्या संस्थेचे मूळ प्रयोजन व कार्यकक्षा ठरवतांना त्यांनी काय भूमिका घेत ही विहित कर्तव्ये पार पाडायची आहेत याचे तपशीलवार विवेचन केले आहे. लोकशाहीत निवडून आलेले हे सरकार आपल्या जनतेसाठी संरक्षक (Protector), जोपासक (Compounder), लवाद, (Arbitrator), नियामक (Controller), म्हणून कार्यरत असावे असे म्हटले आहे. घटनेत विषद केलेली अशी ही निर्देशक तत्वे असली तरी आजच्या सरकारांनी सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा येऊ शकेल अशा क्षेत्रात लुडबूड करायला सुरूवात केली आहे.
     याच घटनेत सरकारी कर्मचा-यांना उपजिविकेचा हक्क मान्य करत अनन्य साधारण संरक्षण दिले आहे. खरे म्हणजे सा-या जगात कर्तव्य व योगदान यांची बांधिलकी सिध्द करणारी हायर अन्ड फायर संकल्पना रूढ होत असतांना असे संरक्षण अनाठायी दिसते. लोकपाल विधेयकामुळे आपल्या या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे दिसताच सा-या व्यवस्थेने एकजूट होत तो प्रयत्न हाणून पाडला. सरकारकडून न्याय्य सेवा मिळवण्याच्या नागरिकांच्या अधिकारावर ते अतिक्रमणच होते याचाही विचार झालेला दिसत नाही. एकदा सरकारी नोकरीत लागल्यानंतर त्याला सहजासहजी कामावरून काढता येणार नाही असे हे कलम म्हणते. मात्र त्याचवेळी शेतक-यांच्या उपजिविकेचा हक्क अप्रत्यक्षरित्या नाकारला आहे. त्याच्या शेतीतील उत्पन्नाला कुठलाही हमी नसल्याने त्याचा उपजिविकेचा हक्क तसाच नाकारला जातो. शेतमालाला रास्त भाव मिळवून देणा-या व्यवस्थांची तजवीज ही सरकारची जबाबदारी मानल्याने सरकार आपल्या अखत्यारित बंदिस्त बाजाराची हस्तक्षेपी धोरणे राबवते व एकप्रकारे शेतमालाच्या लुटीची व्यवस्था कायम ठेवते.
     भारतीय घटना लिहितेवेळी बाबासाहेबांवर भारतातील सामाजिक विषमतेचे प्रचंड ओझे असण्याची शक्यता जाणवते. इतर देशांतील वर्ग व्यवस्था लक्षात घेता  भारतातील वर्ण व्यवस्थेतील सामाजिक समतेची फार मोठी जबाबदारी घटनेवर होती. जी लोकशाही आपण स्विकारली ती इतर देशात प्रत्यक्ष वापरातून सिध्द होत प्रगल्भ झालेली होती व भारतासारख्या शतकानुशतके राजेशाही व सरंजामशाहीच्या अंमलाचा प्रभाव असलेल्या वैविध्यपूर्ण व वैचित्र्यपूर्ण समाजावर तिचा एकाएकी काय परिणाम होईल याचे प्रत्यक्ष परिणाम आपण आज बघत आहोत. लोकशाही जनतेत रुजण्याच्या आतच सत्तेच्या परिघात कार्यरत राहून व्यवस्था नियंत्रित करणा-या घटकांना वाव मिळत सारी लोकशाहीच हायजॅक झाल्याचे दिसते आहे. घटना व तिच्या द्वारा नागरिकांना मिळणारे अधिकार हे केवळ शाब्दिक बुडबुडे ठरत असून आहेरे व नाहीरे वर्ग तयार होत त्यांच्यात प्रचंड दरी निर्माण होत आहे. अशा संधी व क्षमतेच्या असमान वाटणीमुळे शोषक अधिकोधिक प्रबळ होत शोषित मरणासन्न अवस्थेला आले आहेत.
     देशातील संसाधने व नागरिकांचे मूळ घटनादत्त स्वातंत्र्य यांतून योग्य संधी निर्माण झाल्या तर देशातील हे आर्थिक व सामाजिक विषमतेचे विदारक चित्र बदलू शकते. घटनेत विहित केलेली सरकारची परिभाषा, कर्तव्ये व कार्यक्षेत्र याला बांधिल रहात सरकारने आपली जबाबदारी पार पाडत उद्योग, व्यापार व शेती यांना खुलेपणा देत मुक्त बाजारावर देशाची अर्थव्यवस्था सोपवली तर सरकार ताब्यात घेऊन आपले स्वार्थ साधणा-या अनिष्ट घटकांची सद्दी संपून अगदी तळागाळातल्या घटकांनाही आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटू शकेल. त्यांना मारून मुटकून भारत माताकी जय म्हणण्याचीही सक्ती करण्याची वेळ येणार नाही असे वाटते.
                                   डॉ. गिरधर पाटील 9422263689     
  

रविवार, १० एप्रिल, २०१६

ग्रामीण जीवनाचा सामूहिक कोंडमारा



       ग्रामीण जीवनाचा सामूहिक कोंडमारा
          आपला देश तसा अनेक पातळ्यांवर जगत असतो. या सामूहिक जीवनाच्या विविध पातळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, भाषिक अशा विविध कप्प्यात विभागल्या गेलेल्या दिसतात. गेल्या काही शतकातील मानवी जीवनातील जी काही परिवर्तने ठळकपणे अधोरेखित करता येतात त्यात या नव्या समाजजीवनाचे जगण्याचे निकष वा नैतिक मूल्ये प्रस्थापित होत एक नवीनच समाज रचना उदयाला आलेली दिसते. वसाहतवादाचा परिणाम म्हणून शिक्षण, तंत्रज्ञान व भौतिक समृध्दी यांचा पगडा असलेली पाश्चात्य संस्कृती इंग्रजांमुळे आपल्या मूळ संस्कृतीवर आरूढ होत आपल्याकडेही या नव्या समाज रचनेची लागण झालेली दिसते. या बाबतीतील आपल्या भारतीय विचारधारेला समजेल वा पेलवेल अशी एक अभ्यासपूर्वक मांडणी अगोदरच शरद जोशींनी भारत व इंडिया या स्वरूपात मांडली आहे. या दोन घटकांतील संघर्षस्थळांची नेमकी नोंद घेत राजकीय, आर्थिक व सामाजिक तफावतींचा मागोवा घेतला आहे. इतरत्र या नव्या समाज रचनेचा गाभा व्यक्तीस्वातंत्र्य व अर्थवाद असला तरी भारतातील या नव्या समाज रचनेतील परंपरागत चालत आलेली शोषण व दमन ही हत्यारे कायम ठेवत न्याय व समतेबाबत लोकसंख्येचा एक मोठा वर्ग आपल्या वैध अधिकारांसाठी संघर्षाप्रत येऊन पोहचल्याचे दिसते आहे.
          या नव्या समाज रचनेची ओळख करून घेतांना शहरी व ग्रामीण अशी केल्यास समजायला सोपी जाते. तसे तिचे ठळक निकष हे गरिब-श्रीमंत, साक्षर-निरक्षर, सुरक्षित-असुरक्षित, स्थिर-अस्थिर, सुखी-दुःखी अशा पोटकप्प्यातही शोधता येतात. शहरी जीवनाचा आपला प्रत्यक्षदर्शी अनुभव हा प्रथमदर्शीच असल्याने त्याची तुलना एक तर सा-याच बाबतीत भिन्न असलेल्या तशाच पाश्चात्य समाजाशी करणे योग्य ठरावे. कारण ज्या समाजातून हा नव समाज उदयाला आला त्या उर्वरित भारतीय समाजाशी त्याची तुलना करू जाता सारे निकष वा मुद्यांवर प्रचंड विरोधाभास दिसतो. हा विरोधाभास केवळ मानकांच्या संख्यात्मक बाबतीत नसून एकंदरीतच नैतिकतेसारख्या मानवी मूल्यांवर गुणात्मक स्वरूपातही निदर्शनास येतो. आज भारत व इंडियातील वेगवेगळ्या पातळ्यांवर जगणारे हे समाज समूह त्यांना उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करत आपापल्या अस्तित्वाबाबत प्रसंगी संघर्षाची भूमिका घेत आपापल्या स्वार्थाबाबत जागरूतेने वाटचाल करीत असल्याचे दिसते. शोषण व दमन यावर आधारलेली ही रचना केवळ लोकशाही प्रणालीमुळे आटोक्यात असल्याचे दिसत असले तरी आपल्या राजकीय व प्रशासकीय व्यवस्था या प्रामुख्याने ज्याच्या हाती ससा तो पारधी या न्यायाने या नव्या समाजाच्या बाजूने उभे रहात हे सारे असंतुलन वाढवण्याचेच काम करीत असल्याचे दिसते आहे.
          या सा-या प्रक्रियेत बाधित झालेला ग्रामीण समाज एका उपेक्षितासारखा वंचित जीवन जगतो आहे. ग्रामीण जीवनाची बिघडलेली घडी व पोत लक्षात घेता जगातील महासत्ता होण्याची स्वप्ने पहाणा-या या देशातील निम्मी लोकसंख्या देशाच्या सा-या व्यवस्थेतून हद्दपार होत असल्याचे दिसते आहे. या ग्रामीण समाजाला ज्याचा शेती हा उपजिविकेचा मुख्य व्यवसाय आहे त्यांना या देशाच्या संसाधने व साधनसंपत्तीचा त्यांचा वैध वाटा तर जाऊ द्या, त्यांनी केलेल्या उत्पादनाला बाजारात मिळू शकणारा रास्त भावाचा अधिकारही मिळू दिला जात नाही. या सा-या शोषण व दमनाच्या परंपरेला कायद्याचे पाठबळ देत एवढ्या मोठ्या समाजाला न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जाणे ही अशक्य करून टाकले आहे. हा देश कृषिप्रधान असला तरी या देशात शेतीचा असा स्वतंत्र कायदा नाही. आहेत ते जमीन, बिबीयाणे वा किटकनाशके यांच्याविषयात. शेतमालाची आयात निर्यात ही वाणिज्य खात्याला जोडली आहे तर जीवनावश्यक वस्तुंचा कायदा सार्वजनिक वितरण, ग्राहक संरक्षण व पुरवठा खात्याला जोडला आहे. तंत्रज्ञान हे पर्यावरण खाते संमत करते तर संशोधने स्वतंत्र कृषिविद्यापीठात केले जाते. सिंचन, पणन हे विषय शेतीचे असले तरी त्यांची स्वतंत्र चूल मांडली जाते. शेतीचा स्वतंत्र कायदा नसल्याने निश्चित असे धोरण नाही, निश्चित धोरण नसल्याने शेतीच्या सा-या प्रश्नांना वा-यावर सोडत कोणाला जबाबदार धरता येत नाही. इतर क्षेत्रात सा-या नागरिकांना मालमत्तेचा अधिकार असला तरी शेतक-यांना तो नाही. मालमत्ता नसल्याने शेतीत नवे भांडवल येत नाही व शेतमालाला गुंतवणूक केलेले भांडवलही वसूल होत नसल्याने असलेले भांडवल संपुष्टात येत या समाजावर आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
          याचवेळी या देशातला तसा दुसरा वर्ग चंगळवादाला बळी जात एक मोठी बाजारपेठ म्हणून सा-या जगाला आकर्षित करतो आहे. आपल्या संघटितपणाच्या जोरावर आपले स्वार्थ निश्चित व अबाधित ठेवत राष्ट्रीय उत्पन्नातील मोठा हिस्सा आपल्याकडे वळवण्यात हा वर्ग यशस्वी झाला आहे. या सा-या वर्गाच्या एकगठ्ठा मतदारांत रुपांतर झाल्याने सत्ताप्राप्तीसाठी राजकारण्यांना निवडणुकांच्या राजकारणात यांना चुचकारणे आवश्यक ठरते. देशाच्या आर्थिक क्षमतांचा विचार न करता यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातात. आता सातवा वेतन आयोग तशी सरकारी कर्मचा-यांची प्रबळ मागणी नसतांनाही संमत करण्यात आला. औद्यागिक क्षेत्रातील संघटित कामगार वर्गाने संपाचे हत्यार वापरत आपला उद्योग एवढे वेतन देण्यासाठी सक्षम आहे की नाही हे न बघता आमचे काय या हडेलहप्पीतून आपले पगार वाढवून घेतले आहेत. उद्योगांना हा बोजा सहन न झाल्याने काही बंद पडले तर काहीनी देशाचे एक लाख चौदा हजार कोटींची कर्जे बुडवली आहेत. तशी या उद्योगांना दिल्या जाणा-या सवलती वा अनुदाने ही कधीच बाहेर येत नाही मात्र शेतक-यांना न दिल्या जाणा-या मदतींचा डांगोरा पिटला जातो. शेतीच्या उत्पादनाचा संपत्तीत रुपांतर करण्याचा शेतक-यांचा अधिकार सातत्याने डावलला गेल्याने त्यांच्यावरचा वाढत्या कर्जाचा बोजा अनैतिक धोरणांचा परिपाक असल्याने शेतक-यांची कर्जे माफ करावीत ही साधी मागणी मान्य केली जात नाही. मात्र या आश्वासनाचा गैरवापर निवडणुकीत मते मागतांना हमखास केला जातो.
          आजच्या या ग्रामीण जीवनाच्या शोषण व दमनाला एक भ्रष्ट प्रशासन व क्लिष्ट कायद्यांची स्पष्ट किनार आहे. या पिळवणुकीत मानसिक व आर्थिक दृष्ट्या पिळून निघणारे असंख्य शेतकरी आपल्या न्यायासाठी या व्यवस्थेचे उंबरठे झिजवत आपले जन्मोजन्म वाया घालीत आहे. साध्या एका तलाठ्याची चूकाची नोंद एक शेतकरी कुंटूबच नव्हे तर सारी भाऊबंदकी विनाशाला नेत असते. तलाठी वा ग्रामसेवकासारखा निम्नदर्जाचा शासकीय मुलाजम सा-या गावाला, पर्यायाने सा-या शेतकरी समाजाला वेठीस धरू शकतो. महसूलमंत्री काय मुख्यमंत्र्यांपर्यत जरी गेलात तरी माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही इतपर्यंत दहशत पसरवत या व्यवस्थेने ग्रामीण जनजीवनावर आपले वर्चस्व जमवले आहे. या सा-या मरण यातनांतून हा वर्ग सुटावा असे लोकशाहीतील जनकल्याणाची वैध जबाबदारी असलेल्या सरकारला काहीएक वाटत नाही हे या अवस्थेची भीषणता व्यक्त करण्यासाठी पुरेसे ठरावे.
                                                                          डॉ. गिरधर पाटील 9422263689