रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

जखम आर्थिक, फुंकर अस्मितेची !!



          जखम आर्थिक, फुंकर अस्मितेची !!
गेल्या काही दिवसात आपले सारे राजकीय सामाजिक जीवन ढवळून निघते आहे. एकाद्या वर्गावर होणा-या अत्याचारापेक्षा एकाद्या जातीवर होणा-या अत्याचारांची तीव्रता अधिक ठरते आहे. अत्याचार हा अत्याचार असतो तो कोण कोणावर करतो याची कारणे आपल्या व्यवस्थेतच असतात. पूर्वी ती त्यावेळच्या परिस्थितीनुसार सामाजिक म्हणजे जातीय असत, आज ती आर्थिक विषमतेपोटी आलेल्या नैराश्यात दिसतात. गमावलेल्या जीवाची किंमत आईच्या अश्रुंमधून मग जीव बलात्कारासारख्या निर्घृण अत्याचारामुळे गेलेला असो की शाळेत जायला पासला पैसे नाहीत म्हणून चिमुरडीने दिलेला असो, सारखीच असते. त्याची सम्यक प्रतिक्रिया तशी समाजाकडून अपेक्षित असते. कारण समाजाला अशा भावनिक पातळीवर गमावलेल्या जीवांबद्दल भेदभाव बाळगणे हे प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याच्या दृष्टीनेदेखील अडचणीचे ठरते. मात्र यातून निर्माण होणारी व सर्वसामान्यांना जाणवणारी असुरक्षितता नेहमीच जागृत ठेवत समूहांचे वैचारिक कोंडवाडे करत त्यावर राजकारणाची पोळी भाजायची हे प्रकार काही नवे नाहीत. आजच्या मराठा समाजाची अचानकपणे त्यांच्यावरच्या अन्यायाची जाणीव करून देणा-या विराट मोर्च्यांची दखल घेतांना यातील काही मुद्यांचा परामर्ष घेता आला तर या समाजाच्या प्रश्नांकडे व त्यांची सोडवणूक होण्याच्या दृष्टीने योग्य ठरेल.
याच चावडीवरून मी मागे लिहिलेल्याकोपर्डीचे वास्तवया लेखात काही विधाने केली होती. त्यात परिस्थितीचे विश्लेषण करतांना, या बलात्कारीय निर्घृणतेच्या पलिकडे असलेला कितीतरी क्रूर असा मानवी चेहरा बघायला मिळतो त्याचा उगम कुठून झाला व एकाच गावात रहाणा-या ग्रामस्थामध्ये एकमेकांविषयी एवढा तिरस्कार कसा निर्माण करता येऊ शकतो हेही न उलगडणारे कोडे आहे. (सर्वसाधारणपणे गावात रहाणारा व तसा कुठलाही उद्देश नसणारा सामान्य माणूस असे कृत्य करू शकत नाही, त्यामागे इतर प्रेरणा कार्यान्वित व्हाव्या लागतात) मानसशास्रीय दृष्ट्या बलात्काराला विरोध करणा-या पिडित मुलीवरचा अत्याचार हा त्यापुरताच मर्यादित असतो. मात्र या बलात्कारानंतर त्या पिडितेची अवस्था एवढी भीषण व अमानुष करण्यात आली की बलात्कारापेक्षा त्यातील भीषणतेला प्राधान्य देण्यात आलेले दिसते. जे अधिक भावनोद्दिपित करणारे ठरते. यातून बलात्कारींना वा इतरांना या घटनेला हीन स्वरूप देणा-या प्रवृत्ती व प्रेरणा या सामान्य स्वरूपाच्या नाहीत. अर्थात या सा-या घटनेचे झालेले राजकियीकरण बघता नेमके काय झाले हे बाहेर येणे कठीण असले तरी या प्रकरणात काही तरी वेगळे पाणी मुरतेय एवढे मात्र नक्की. असे मी म्हटले होते. या वक्तव्यावर बरीचशी वादावादीही त्यावेळी झाली. मात्र ती वेळ एवढे दूरदर्षी अनुमान काढण्याची नसल्याने व त्यातून परत जातीयवादालाच खतपाणी मिळत त्याची चर्चा टाळण्याच्या दृष्टीने पुढे काय होते हे पाहून ठरवावेसे वाटले.
आज जी काही परिस्थिती तयार होते आहे तिलाही संशयाचा फायदा देत यामागे केवळ मराठा समाजाचा आक्रोशच आहे, बाकी काही नाही असे समजता येईल. मग प्रश्न उभा रहातो मराठा समाजावरील ख-या अन्यायाचा, ज्या विरोधात या समाजाने आज नव्हे तर कधीच पेटून उठायला हवे होते. उलट आजवरच्या अन्यायाविरोधात समाज पेटून का उठत नाही हा समाज अभ्यासकांच्या आक्षेपाचा रोख याच समाजाकडे जातो. तसा हा समाज ग्रामीण आहे व प्रामुख्याने शेती, राजकारण, शिक्षण, सहकार, नोकरी याच्याशी संबंधित आहे. आता ही सारी क्षेत्रे गंभीरस्वरूपात समस्या वा अन्यायग्रस्त आहेत. गंमत अशी की या विचित्र परिस्थितीत अन्याय करणारे व अन्यायग्रस्त याच समाजाचे दिसतात. म्हणजे साखर सम्राट उस उत्पादकांचे शोषण करीत असतात, शिक्षण सम्राटांनी मराठा म्हणून कुणाला फुकट प्रवेश दिल्याचे एकही उदाहरण नाही, राजकारणी तर प्रत्येक कामाचे रेटकार्ड दाखवत पैसे घेऊनच बदल्या व टेंडरची कामे करीत असतात, नोकरीत असलेले तलाठी, पोलिस, शासकीय कर्मचारी हे बव्हंशी मराठाच असून त्यांच्याविरोधात होणारी सारी ग्रामीण मराठा समाजाची जाहीर तक्रार ही आजवर अन्यायग्रस्त समजली गेली नाही. म्हणजे आजचे मोर्चे हे या अन्यायग्रस्त समाजाचे समजायचे की ज्यांच्या हातातून अन्याय करण्याची हत्यारे गमावली गेली त्यांचे समजायचे हे लक्षात येत नाही. अन्यायग्रस्त समाजाचे असतील तर त्यांचे स्वागतच आहे पण त्यातून सत्ता गमावलेल्या शक्तींचा एकादा राजकीय प्रयत्न असेल तर नुकतीच मागच्या निवडणुकीत अपेक्षाभंग झालेली भोळीभाबडी जनता परत एकदा अशा राजकीय कटकारस्थानाला बळी गेल्याचे स्पष्ट होईल.
 आम्हीही चळवळीत तीसतीस वर्षे घालवली आहेत. एकाद्या गंभीर वा महत्वाच्या प्रश्नावर पाचपंचवीस लोकांचे आंदोलन उभे करायचे म्हटले की काय प्रसंगांना तोंड द्यावे लागते हे आम्ही अनुभवले आहे. त्यावेळी आपल्या रोजीरोटीशी संबंधित असलेल्या प्रश्नापेक्षा कुणाला आपला पक्ष महत्वाचा वाटतो, कुणाला दहावेतेरावे असते तर कुणाला जाहीररित्या काही करायचे नसते. म्हणजे प्रश्न यांचे दुस-यांनीच सोडवायचे आणि निवडणुका आल्या की हे भलत्यालाच फेटे बांधणार, एवढेच नव्हे तर घरातल्या बाईला औक्षण करायलाही पाठवणार आणि फोटो काढून मिरवूनही घेणार असा हा सारा अज्ञानमूलक मामला आहे. आज हा समाज सा-या राजकीय पक्षांमध्ये सारखाच सक्रिय असलेला दिसतो व पूर्वीचे गावचे पाटील सारा गोळा करून वतनदाराला पाठवायचे तसे आजच्या शोषक राजकीय व्यवस्थेचे हस्तक होत आपल्याच भाऊबंदांच्या शोषणावर आपल्याला चार तुकडे मिळवतो. या गैरप्रक्रियेत होणा-या कारवाईतही आपलाच बळी जाणार हे सिध्द होऊनही या समाजाला तशी जाग येत नाही.  असा हा समाज आपल्या ख-या प्रश्नांना बाजूला सारत अचानकपणे लाखोंच्या संख्येनी एकत्र येऊ लागतो तेव्हा मात्र या सा-या प्रकाराची शंका येणे क्रमप्राप्त आहे. या संघटनातून या समाजाची नव्हे तर या समाजाला नियंत्रित करणारी जी काही घराणी आहेत त्यांची ताकद दिसते असे म्हटले तर वावगे ठरू नये
यातून या समाजाला दोष देण्याचा उद्देश नाही तर आजच्या परिस्थितीत जात म्हणून एकत्र येण्यापेक्षा वर्ग म्हणून वास्तववादी, व्यवहारवादी, अर्थवादी विचारसरणीचा स्विकार केला तरच काही मार्ग दिसू शकेल. कारण सत्ता येत राहील, पक्ष येत रहातील, नेतेही येत रहातील पण या सा-यांच्या वापरातून हा समाज मात्र आहे तिथे असल्याचे दिसेल एवढे मात्र नक्की !!
                                                           डॉ. गिरधर पाटील  9422263689

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा