सुप्तशक्ती की सुप्तविधायकता ?
आजवर घडत आलेल्या सा-या दखलपात्र वा लक्षणीय
घटनांकडे सर्वसाधारणपणे बघण्याचा आपल्या सा-यांचा दृष्टीकोन हा राजकीय
परिप्रेक्ष्याचा असल्याने प्रचंड संख्येने निघणारे मराठा मोर्चे आपल्या झापडबंद
विश्लेषणात सामावणे जरा अवघड होऊ लागले आहे. सुरूवातीला एकाद्या राजकीय घटकाचा
सत्ताकारणाचा एक भाग असे ध्वनित केले जाणारे हे मोर्चे मात्र एकेका मोर्च्यानंतर
आपली मते बदलण्यास कारणीभूत ठरत असून त्यामागे कुठले तरी सामाजिक वा आर्थिक घटक
कार्यरत असल्याचे दिसत असून नेहमीप्रमाणे सरकार विरूध्द असा राजकीय पवित्रा न घेता
सर्वसामान्यांचा एक सार्वत्रिक एल्गार असे या मोर्च्याचे स्वरूप दिसू लागले आहे.
माझ्या मते या कोंडीला वाट फोडून द्यायचे सारे श्रेय मराठा समाजाला तर द्यावेच
लागेल त्याचबरोबर या व्यवस्थेत वंचित ठरलेल्या सा-या समाज घटकांच्या भावनाही अतिशय
प्रभावी व परिणामकारकरित्या ऐरणीवर आणण्याचे काम या मोर्च्यानी केले आहे. अर्थात
या सार्वत्रिक असंतोषाचे विभाजन करून त्यात आपली पोळी भाजण्याचे काम लपून राहिलेले
नसले तरी त्याबाबत मराठा समाजाने घेतलेली भूमिका ही सा-या राजकीय व्यवस्थेला
दिलेला एक इशारा आहे की तुमचे राजकारण आता पुरे झाले, आता जनताही शहाणी झाली आहे व
वेळीच सुधरला नाहीत तर जनसामान्यांचा अविश्वासच नव्हे तर रोषालाही सामोरे जाण्याची
तयारी ठेवा. त्यामुळे आपल्या प्रभागात, मतदार संघात वा राजकीय प्रभावक्षेत्रात या
राजकीय नेतृत्वाची झालेली कोंडी व त्यांना त्यावर सापडत नसलेले उत्तर हे या
मोर्च्याचे मुख्य फलित समजले पाहिजे व आपल्या कुटिलकारस्थाने व राजकीय डावपेचांनी
सर्वसामान्यांचे जीवन हैराण करून टाकणा-या व तसे वातरत जाणा-या व्यवस्थेला कट टू
साईज करण्याचे कामही या मोर्च्यांनी केले आहे.
या मोर्च्यात वंचितपणाची भावना जशी प्रकर्षाने प्रकट होतेय त्याचप्रमाणे
अप्रत्यक्षरित्या का होईना नागरिकांना मिळालेल्या घटनादत्त अधिकारावर अतिक्रमण
करणारी ही राजकीय व्यवस्था अनिर्बंधपणे जनतेच्या आशाआकांक्षा व इच्छाअपेक्षांची
पायमल्ली करत आपले निजी कार्यक्रम वा स्वार्थ राबवण्यात कुठलाही विधिनिषेध न
बाळगता स्वैर वागू लागली होती त्याचाही परिणाम जाणवतोय. सत्ताकारणात वैधअवैध,
नैतिकअनैतिक, खरेखोटे मार्ग अवलंबत लोकशाहीला अपेक्षित नसलेली राक्षसी ताकद
असल्याचे प्रमाण देत सामान्यांचे ज्या पध्दतीने क्षुद्रीकरण होत होते त्यातून
सामूहिक निरूपाय व हतबलता वाढीस लागल्याचे जाणवू लागले होते. या असंतोषाची जाणीव
इतरांपेक्षा ज्या व्यवस्थेच्या विरोधात हे सारे चालले आहे त्यांना असणारच, म्हणून
त्यातून निर्माण झालेले गुजराथ व हरियानातील उद्रेक शमवण्याचे काम त्या उद्रेकांची
उचित दखल न घेता केवळ पाशवी बळ वापरून करण्यात आले. त्यामानाने महाराष्ट्रात मराठा
मोर्च्यांनी घेतलेली काळजी खरोखरच वाखाणण्याजोगी असून आपल्या घराला लागलेल्या
आगीवर आपण बादलीभर पाणीही टाकू शकत नाही या हतबलतेला स्वतःला सर्वशक्तीमान
समजणा-या राजकीय व्यवस्थेला आणून टाकण्याचे कामही याच मोर्च्यांनी केले आहे.
आपल्या माध्यमांनाही हे सारे अजून समजून घ्यायला वेळ लागतो आहे. एकतर अगोदरच
प्रचलित व्यवस्थेच्या लांगूलचालनात चूकलेली आपली परखड व निरपेक्ष मार्गदर्शकाची
गमावलेली वाट पकडत एकाएकी जनतेच्या बाजूने असे लिहायचे म्हणजे सारे काही
विस्कटायचेच काम ठरते आहे. एकतर दूर्लक्षाने मारायचे वा दिशाभूल करायची या
प्रयत्नात सारे अडकलेले दिसताहेत. माध्यमातून या मोर्च्यांचे मराठ्यांचे शक्तीप्रदर्शन
असे वर्णन केले जात आहे. एकतर हा शब्द विविध घटकांमध्ये झुंज लावण्याच्या
प्रवृत्तीचा निदर्शक आहे व मराठे जणू आपली शक्ती दाखवत इतर समाज घटकांवर दबाब
आणण्याचे काम करीत आहेत असाही प्रचाराचा एक भाग ठरतो आहे. वास्तव असे आहे की या
मोर्च्याला मराठ्यांचा पुढाकार असला तरी आपल्या मूळ संस्कृतीतील सामाजिक व आर्थिक
क्षेत्राशी जुळलेल्या सा-या वंचित घटकांचे त्यात प्रतिनिधित्व जाणवते आहे व त्यात
मराठा जातीपेक्षा एक व्यापक हिताची भावना व्यक्त होत असल्याने या मोर्च्यात इतरही
घटकांचे अस्तित्व जाणवते आहे. जातीयवाद जेवढा राजकारण्यांच्या मनात असतो तेवढाही
बाळगणे हे प्रत्यक्ष जगणा-या सामाजिक घटकांना रोजच्या जीवनात शक्य नसते व सारी
सामाजिक तेढ ही गावपातळीवरच्या क्षुद्र राजकारण्यांचे कारनामे म्हणूनच कार्यरत होत
असते. त्यामुळेच कोपर्डीसारख्या घटना घडतात की घडवल्या जातात हा वादाचा विषय ठरतो.
आता या निमित्ताने अप्रत्यक्षरित्या का होईना उजागर झालेली ही शक्ती वा ताकद
ही हतबल झालेल्या समाजाला संजीवनी समजायला हवी. आपल्या निरनिराळ्या समस्यांना
सरकारची चूकलेली धोरणे तर आहेतच, त्यांचे परिमार्जन न करता सामान्य जीवन नासवून
टाकणारे गावपातळीवर सर्वासमान्यांना छळणारे साधे साधे शासकीय मुजालिम व राजकीय
शक्ती शिरजोर होत त्यात तेल ओतण्याचे काम करीत. सनदशीर मार्गाने ज्यांच्याकडे
तक्रार करायची ती यंत्रणाच या अवैध व्यवस्थेची लाभार्थी असल्याने
सर्वसामान्यांच्या विहित हक्कांची कोंडी होत त्यांचे अपरिमित शोषण होत होते. आता
या शक्ती प्रदर्शनामुळे का होईना ही व्यवस्था काही घडा घेईल असे वाटते. अशा प्रकट
झालेल्या या शक्तीचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फायदे असले तरी या निमित्ताने
त्यातून काहीतरी विधायकता निर्माण व्हावी असे वाटते. आज राजकीयच नव्हे तर आपल्या
सामाजिक व आर्थिक क्षेत्रात केवळ सरकारच्या आडमुठेपणाने अनेक सुधारांचा अनुशेष
निर्माण झाला आहे. शेती, शिक्षण, आरोग्य अशा महत्वाच्या क्षेत्रात प्रचंड खर्च
होऊनही सर्वसामान्यांना त्याच्या लाभापासून वंचित रहावे लागते. आज ग्रामीण जीवनाला
सुजलाम सुफलाम करणा-या शेती, शेतमाल बाजार, प्रक्रिया, आयातनिर्यात या क्षेत्रात
ग्रामीण तरूणांना अपरिमित संधी असून केवळ सरकारच्या मेक इन इंडियासारख्या चूकीच्या
धोरणांचे बळी ठरावे लागते आहे. यातून विधायकतेचा उपयोग आपले सुखी व समाधानाचे
ग्रामीण जीवन, त्यातील सामाजिक सलोखा, आर्थिक उन्नती, कौटूंबिक समाधान, अशी लक्ष्य
ठेवत आपल्या छळाला कारणीभूत ठरणा-या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेचे शुध्दीकरण
करण्यात वापरला तर या प्रकट झालेल्या शक्तीचे चीज होऊ शकेल. या शक्तीचा अप्रत्यक्ष
वापर अशा विधायकतेत झाला तर यातून होणा-या राजकीय उलथापालथीपेक्षा ग्रामीण समाजाला
खरोखर दिलासा देण्याचे श्रेय या मोर्च्यांना देता येईल.
डॉ.
गिरधर पाटील 9422263689 girdhar.patil@gmail.com