अर्थवादा विरोधात जात-धर्मवाद...
गेल्या काही दिवसातील माध्यमातील बातम्या बघितल्या तर रोहित वेमुलाची
आत्महत्या व हरियानातील जाटांचे आरक्षणवादी आंदोलन यांनीच प्रामुख्याने व्यापल्या
होत्या. तशी ही आंदोलने जातीयवाद निदर्शक असल्याने परत एकदा भारतीय राजकारणातील
जातीयवादाचे स्थान अधोरेखित झाल्यापलिकडे त्यातून फारसे निष्पन्न झाले असे म्हणता
येणार नाही. जेएनयूतील आंदोलन हे तथाकथित राष्ट्रवादी व देशद्रोहाचा मुद्दा घेत
अवतरले असले तरी त्यातून होणा-या विचारमंथनापेक्षा माध्यमातील जागा व्यापण्यासाठीच
त्याचा उपयोग झालेला दिसतो. मेक इन इंडिया या समारंभी कार्यक्रमाची जातकुळी
अर्थवादी असली तरी त्या निमित्ताने झालेल्या चर्चात भारतीय अर्थविश्वाची सतत होत
असलेली पिछेहाट व सरकारचे अवास्तव दावे हेच प्रामुख्याने लक्षात राहिले व अर्थक्षेत्राला
अपेक्षित असणा-या आर्थिक सुधारांकडे कानोडोळा करत या कार्यक्रमाचा राजकीय फायदा
घेण्यातच धन्यता मानली गेली. ही सारी आंदोलने वा कार्यक्रम देशातील जनतेपुढे
असलेल्या ख-या प्रश्नांपासून त्यांची तीव्रता कमी करत काही काळ तरी बाजूला नेऊ
शकली हे यांचे वैशिष्ठ्य समजले पाहिजे.
त्यामानाने शेतक-यांच्या आंदोलनाची मूकस्तरावर जी काही आगेकूच चालली आहे तिची
धास्ती घेत सरकारला तोंडदेखलेपणाने का होईना दखल घेणे भाग पडते आहे. दुष्काळ हे
तात्कालिक परिस्थितीजन्य कारण असले तरी शेतक-यांची नवी पिढी या सा-या प्रश्नांकडे
अधिक अभ्यासू व डोळसपणाने पाहू लागल्याने या आंदोलनाला एक धार येऊ लागली आहे. पक्षीय
राजकारणाला प्रथमच यातला धोका जाणवू लागला आहे. सध्या या आंदोलनाचे स्वरूप काहीसे
विस्कळीत व असंघटितपणाचे वाटत असले तरी शेतक-यांच्या सर्व स्तरात होत असलेला उठाव हा
निश्चितच आशादायी आहे. शेतक-यांची आंदोलने ही प्रामुख्याने शेतमाल भावाची आहेत व
शेतीचे उत्पादन वाढले तरी व्यवस्थेतील कमतरतांमुळे शेतकरी दिवसेंदिवस गरीबच होत
चाललाय या आशयाची अर्थवादी निदर्शक आहेत. शेतकरी आंदोलनाचा आजवरचा अनुभव असा आहे
की शेतकरी ज्या ज्यावेळी आपल्या अर्थवादी मागण्यांबाबत सबळ व सक्षम होत उभे
रहाण्याचा प्रयत्न करतात व त्यांच्या प्रश्नांना एक टोक येऊ लागते, त्याचवेळी
जातीयवादी व धर्मवादी शक्ती अचानकपणे सक्रीय होत (वा करत) या आंदोलनांना अपशकून
करतात व त्याचवेळी व्यवस्था बदलाच्या शक्यता धुळीला मिळत शेतकरी आपल्या पदरात
काहीही पडण्यापासून वंचित रहातात.
मागच्यावेळी महाराष्ट्रातला दुष्काळ गंभीर होत सरकार त्याबाबत फारसे गंभीर न
दिसल्याने व केवळ घोषणाबाजी दिसू लागल्याने शेतकरी समाजात तीव्र प्रतिक्रीया उमटू
लागल्या होत्या. त्याचवेळी केंद्रातील व राज्यातील सरकारांचे इतरही आघाड्यांवरचे
अपयश उघड होऊ लागताच गुजराथेत अचानकपणे काहीएक कारण नसतांना पटेल समाजाचे
आरक्षणवादी आंदोलन उभे करण्यात आले व काही काळ तरी या दोन्ही सरकारांना श्वास
घ्यायला जागा मिळाली. गुजराथेतील पटेल समाज हा तसा सधन समजला जातो. आरक्षणातील
मिळणा-या फायद्यांपेक्षा या जमातीचा आपल्या धंदा व व्यापारी क्षमतांवर अधिक
विश्वास असतो. मग असंतोषाच्या पातळीवर तसे काहीच नसतांना लाखोंच्या संख्येत हा
समाज हा एकाएकी कसा आंदोलन करतो ही विचार करण्यासारखी बाब आहे. आणि खरोखर असंतोष
असल्याचे मान्य केले तरी ज्या वेगाने हे आंदोलन शमले त्याअर्थी या आंदोलनाचा
राजकीय हत्यार म्हणून केलेला वापर म्हणूनच जास्त लक्षात रहाते.
शेतक-यांच्या या सा-या अर्थवादी संघर्षाचा रोख हा मूलगामी व्यवस्था बदलाचा
असतो व सरकार नामक व्यवस्थेला नेहमीच अनुनयी मदती व तात्पुरत्या मलमपट्टी करत वेळ
मारून न्यायची असते. शेतमाल हा औद्योगिक क्षेत्राचा कच्चा माल असतो त्याचवेळी
स्वस्त श्रम उपलब्ध करून देण्यासाठी त्याचे दर निम्नस्तरावर ठेवणे आवश्यक असते.
औद्योगिक क्षेत्राला सतत नफा होत त्यांना स्वतःच्या उत्पादनी कार्यक्षमतेपेक्षा
जागतिक बाजारात स्पर्धा करणे सोपे व्हावे व त्याचबरोबर स्वस्त दरात मजूरांचा
पुरवठा होत रहावा हे सूत्र त्यामागे असते. आता तर अन्नसुरक्षेमुळे भारतातील सारी
श्रम बाजारपेठ कोसळली असून शहरी भागात प्रचंड बेरोजगारी तर शेतीत मजूरच नाही अशी
विचित्र परिस्थिती तयार झाली आहे. या प्रयत्नात सारा शेतमाल बाजार नियंत्रणात ठेवत
त्यात एकाधिकार तयार होत गेल्याने शेतमालाची बाजारातील प्रत्यक्ष किंमत व
शेतक-यांना मिळणारे भाव यात प्रचंड तफावत पडत काही घटकांना प्रचंड नफा कमावण्याची
संधी प्राप्त झाली आहे. त्यांच्या आर्थिक क्षमता एवढ्या बलाढ्य झाल्यात की उत्पादक
शेतकरी व उपभोक्ता ग्राहक या कोणाचीही पर्वा न करता केवळ सरकारवर प्रभुत्व जमवत
आपले स्वार्थ अबाधित व वाढते ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे. आता सरकार चालवणारे
घटक कोणते आहेत हे सा-यांच्या लक्षात आल्याने व त्यांना प्राप्त होणारे सरकारी
समर्थनही लपून न राहिल्याने ते असा बदल सहजासहजी होऊ देतील असे संभवत नाही हे या
सरकारच्या हतबलतेचे मुख्य कारण आहे. शिवाय राजकीय व्यवस्थेला देशातील पासष्ट टक्के
लोकसंख्या सातत्याने अडचणीत ठेवत निवडणुकांच्या राजकारणात सुलभतेने वापरता येते व
त्यांच्या उध्दाराचे सर्वाधिकार आपल्या हातात ठेवत त्यांचे रूपांतर स्वतंत्र विचाराचे व कोणावर अवलंबून न रहाणा-या
मतदारात करावयाचे नसते. शेतकरी स्वतंत्र व स्वावलंबी झाला तर अनेकांची राजकीय
दुकाने बंद होतील हे गमतीने का होईना म्हटले जाते त्यामागचा अर्थ हा आहे.
लोकशाहीत एकाद्या वंचित घटकाच्या संघर्षप्रक्रियेत इतर घटकांनी आपापले स्वार्थ
जोपासण्याच्या प्रयत्नात असे अडथळे येणे स्वाभाविक आहे. हे आपापले स्वार्थ कसे
जोपासले जातात, त्यामागच्या प्रेरणा कशा कार्यरत होतात हे शेतकरी आंदोलनांनी
आत्मसात केले पाहिजे. सरकारला आपल्या हिताचा निर्णय घेण्यास बाध्य करण्यासाठी आपली
काय ताकद उभी केली पाहिजे याचा विचार आजवर झाला नाही तो आज करण्याची गरज आहे.
औद्योगिक क्षेत्राचे एक लाख चौदा हजार कोटींचे कर्ज कुठलीही मागणी वा आंदोलन न
करता कसे माफ होते व शेतक-यांच्या मुलीला शाळेत जायला पासला पैसे नाहीत म्हणून
आत्महत्या करावी लागते हे आपण या व्यवस्थेत पासष्ट टक्क्याने असूनही आपली किंमत
शून्य असल्याचे निदर्शक आहे. रोहित वेमुलाच्या आत्महत्येने जातीयवादाची
पार्श्वभूमी असूनही सारा देश हादरला आहे असे चित्र माध्यमे उभी करू शकले. त्याच
दरम्यान आपल्या लग्नाचा बोजा आपल्या बापावर पडू नये म्हणून एका शेतक-याच्या मुलीने
आत्महत्या केली. या दोन्हीही आत्महत्या या चिंतनीय आहेत, परंतु अर्थवादी
शेतक-यांच्या मुलीची किंमत आपण शेतीच्या प्रश्नांकडे कसे पहातो हे स्पष्ट
करण्यासाठी पुरेशी आहे.
आज शेती व शेतकरी समाजाच्या अस्तीत्वाचाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. आजचा शेतकरी
जरी जात, धर्म, प्रदेश वा आर्थिक निकषांवर विविध कप्प्यामध्ये विभागलेला वाटत असला
तरी किमान समान मागण्यांवर एकत्र येऊन सरकारला तसे निर्णय घेण्यास बाध्य करणे ही
काळाची गरज आहे. आपले मानपान मोठे की शेतक-यांचे हित हे ओळखत सा-या शेतक-यांनी
एकत्र आले पाहिजे. आपल्या लग्नासाठी पैसे नसल्याने मुलींचा लग्न न करण्याचा
समजूतदारपणा ज्या समाजात आहे त्या समाजाला आपल्याच हितासाठी एकत्र येणे फारसे जड
जाऊ नये एवढेच या निमित्ताने !!
डॉ. गिरधर
पाटील 9422263689