रविवार, १६ एप्रिल, २०१७

कर्जमुक्तीचा सोपा मार्ग



                कर्जमुक्तीचा सोपा मार्ग
एकादा विषय न समजल्याने आलेल्या अपयशामुळे त्यातील प्रश्नच सोडवायचे नाहीत अशी अवस्था शेती या विषयाबाबत आपल्या सरकारांची झालेली दिसते. शेतीसाठी काहीही केले तरी शेतीची विपन्नावस्था काही संपत नाही त्यामुळे शेवटी सत्ता टिकवण्याला प्राधान्य देत सरकारचा कालहरणाचा प्रयोग चालू आहे. कर्जमाफीच्या बाबतीत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी कर्जमाफी हा काही त्यावरचा उपाय नाही. दुसरीकडे यांचेच सरकार असलेल्या उत्तर प्रदेशात हाच उपाय ग्राह्य व वैध मानला जातो. व दुसरी म्हणजे राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात राज्याला हा सुमारे तीस हजार कोटींचा भार पेलवणे शक्य नाही.
          शेतकऱ्याच्या हलाखीची कारणमीमांसा करतांना शेतकऱ्यांचे उत्पादन कमी म्हणून त्यांचे उत्पन्न कमी असे आपले कृषिखात्यातील उच्चविद्याविभूषित गणंग सांगत होते. त्यावर आपल्या शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न कैक पटीत वाढवले तर त्याला सामावून घेणारा शेतमाल बाजार सरकारने आपल्या कचाट्यात ठेवत या वाढीव उत्पन्नाला किमान उत्पादन खर्चही मिळू द्यायचा नाही अशी सरकारची धोरणे. एकाद्या बाजारात विक्रेत्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात खरेदीक्षमता वाढवाव्यात हे सरकारला उमजत नाही. कारण ठिकठिकाणच्या शेतमाल बाजारात फोफावलेला एकाधिकार. शेतकऱ्यांचा माल त्यांच्या भावात विकला नाही तर त्यांनी तो फेकूनच द्यावा असा आपला कायदा आहे. सरकार एकतर या बाजाराला उचित न्याय देत नाही दुसरीकडे त्याच्या स्वबलावर खुलेपणातून विकसितही होऊ देत नाही. आज या बाजारात खरेदीसाठी तयार व उत्सुक असणारे अनेक रोजगारनिर्मितीक्षम घटक या बाजारात येऊ दिले जात नाहीत. लासलगांवच्या कांदा व्यापाऱ्यात कोंडाळ्यातील जून्या व्यापारी परिवाराशिवाय खरेदीला कोणाला परवानगी देऊ नये असा फतवा सरकारच्या बाजार समितीवर बंधनकारक ठरत असून पणन खाते केवळ आपल्या निजी स्वार्थासाठी त्यावर शेतकऱ्यांना काही न्याय मिळेल अशी कारवाई करायला धजावत नाही. वाशीच्या बाजार समितीत नव्या खरेदीदाराचा गाळा व शेतमाल दिवसाढवळ्या पेटवून त्याला हाकलून दिले जाते. कारवाई शून्य. विदर्भातील कापूस बाजार, कोल्हापूरातील गूळ बाजार, वाशीतील आंबा बाजार, सांगलीतील हळद बाजार, जळगावातील केळी बाजार असे अनेक बाजार या माफियांच्या हातात गेले असून केवळ संपावर जाण्याच्या धाकाने ते सरकारला आपल्या बोटावर नाचवत असतात. या बाजारात खरेदीची पर्यायी व्यवस्था उभी रहावी अशी सरकारची इच्छा व क्षमताही नाही. अशावेळी सरकार हा बाजार आपल्या ताब्यात ठेवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करत शेतकऱ्यांच्या शेतमालाला उचित न्याय मिळण्यापासून का रोखते आहे हे कळत नाही.
          याचे साधे व सरळ कारण आहे की या बाजारातून निर्माण होणारा अवैध पैसा. या अवैध पैशांचे प्रमाण एवढे आहे की एकाद्या राजकीय पुढाऱ्याला मंत्री होतो कि बाजार समितीचा सभापती तर तो नक्कीच बाजार समितीचा सभापती होईल. आज सरकारला भेडसावणाऱ्या तीस हजार कोटींची तरतूद केवळ या बाजारातील शेतकऱ्यांची अवैधरित्या होणाऱ्या लूटीला आळा घातला तरी त्यातून होणाऱ्या करचुकवेगिरीतून करता येईल. या पारदर्शकतेतील स्पर्धात्मक वातावरणामुळे शेतकऱ्याला उचित दर मिळालातर त्याचा कर्जबाजारीपणा आटोक्यात येत आजच्यासारख्या अराजक वा असंतोषाला तोंड देण्याची सरकारला गरज रहाणार नाही. दुसरा भाग असा की या बाजाराच्या मर्यादित खरेदीक्षमतांमुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाची जी हानि होते ती त्याच्या वैयक्तीक नुकसानीबरोबर राष्ट्रीय उत्पादनाचीही हानि करते हे कोणी लक्षात घेत नाही. म्हणजे या वाढीव उत्पादनाचे आकडे सरकार आपली पाठ थोपटून घेण्यासाठी राष्ट्रीय सकल उत्पन्नात धरते त्याचवेळी पुढे या शेतमालाचे काय झाले याबाबत मात्र मूग गिळून बसते.
          2008 च्या कॅगच्या उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यातील कृषि उत्पन्न हे सुमारे चार लाख कोटींचे असल्याचे दाखवले आहे. याच अहवालात पुढे असेही म्हटले आहे की राज्यात तीनशे पाच बाजार समित्या कार्यरत असून त्यात दरवर्षी सुमारे चाळीस हजार कोटींची उलाढाल होते. म्हणजे नियमनमुक्तीपूर्व काळात ज्या शेतमालाला बाजार समित्यांशिवाय पर्याय नव्हता त्या बाजार समित्यातून केवळ दहा टक्के शेतमालाची विक्री हिशोबात दाखवली जात असे. यात शेतमालाच्या भावाबरोबर बाजार समित्यांचा सेस, सरकारचा विक्री व इतर अनुषांगिक कर, या शेतमालाच्या हमाली, वाहतूक वा जकातीसारखे इतर कर चुकवून कोणाच्या खिषात जातात हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. परळीसारखी छोटी बाजार समिती, जी अगोदर वीस लाख रुपये तोट्यात होती एका कार्यक्षम सचिवाने या गळतीला आळा घालताच केवळ तीन महिन्यात दोन कोटी रुपयांच्या फायद्यात आली. एवढा फरक लक्षात आल्यानंतर या सचिवाचे कौतुक करण्याऐवजी आपल्या राजकीय व्यवस्थेने पणन खात्याला हाताशी धरून या सचिवाला सळो की पळो करत कामावरून काढून टाकले व आज तीच बाजार समिती चिपाड होत कर्जबाजारी झाल्याचे दिसते. हे एक उदाहरण बाजार समित्यांमध्ये काय चालते हे दाखवायला पुरेसे आहे.
          म्हणजे सरकारने केवळ या हिशोबात दाखवल्या न गेलेल्या शेतमालाच्या विक्रीतील गळती थांबवली व हे कराचे दर किमान दहा टक्के धरले तरी दरवर्षी सरकारचे उत्पन्न छत्तीस हजार कोटींनी वाढू शकते. शिवाय वाढलेल्या खरेदीक्षमतांमुळे स्पर्धा होत शेतमालाला अधिकचा भाव मिळू शकेल व त्याला कर्जात ढकलणाऱ्या संकटाचे परिमार्जनही होऊ शकते. मात्र सरकारला शेतकऱ्यांची झाली लूट ही शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यापेक्षा आपल्या राजकीय व्यवस्थेला सत्ताकारण व राजकारण करण्यासाठीच मिळवण्याचा अट्टहास दिसतो आहे.
          माझी सरकारला विनंती आहे की प्रामाणिक जनतेचा पैसा सरकारमध्ये आज ज्या मार्गाने हडप होतोय त्या मार्गाने शेतकऱ्यांना कर्जमाफी मुळीच नको. तो पैसा तुम्हालाच लखलाभ होवो, मात्र शेतकऱ्यांच्या हक्काचे जे पैसे तुमच्या चुकीच्या धोरणामुळे नको त्या घटकांच्या घशात घालताहात तेवढे काढून परत त्याची लूट वापसी करा. असे जर झाले तर एकाद्या वर्षी द्यावी लागणारी कर्जमाफी परत द्यावी लागणार नाही याची हमी मात्र तुम्ही मागितली नाही तरी आम्ही देतो एवढे मात्र नक्की.
                                                                    डॉ. गिरधर पाटील 9422263689

नियमनमुक्तीतून कर्जमुक्ती



               नियमनमुक्तीतून कर्जमुक्ती
     सध्या कर्जमुक्ती हा राजकीय परावलीचा शब्द झाला आहे. आपल्या राजकीय व्यवस्थेला कालहरण करण्यासाठी अशी हाडकं चघळण्यासाठी लागतात. करायचं काहीच नाही, होऊही द्यायचं काहीच नाही दरम्यान मात्र आपला स्वार्थी ध्येयभाग उरकत रहायचा असा सत्ताधारी व विरोधकांचा कार्यक्रम असतो. पंक्तीला बसलेले ते सत्ताधारी व त्यांच्यामागे आशाळभूतपणे ताटकळणारे विरोधक यांच्यात तसा आता गुणात्मक फरक राहिलेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या भर पंक्तीत एकादी जागा रिकामी झाली तर विरोधकांतला कोणीही तिथे चपखलपणे विराजमान होऊ शकतो अशी ही आपली व्यवस्था असतांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मात्र काहीच होऊ द्यायचे नाही असा दोघांमध्ये अलिखित करार झालेला असतो. देव जाणे एकाद्यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले आणि तो आत्मनिर्भर होत स्वतंत्रपणे जगू लागला तर या साऱ्यांची राजकीय दुकाने बंद व्हायला वेळ लागणार नाही हे त्यांना चांगले माहित असल्याने येणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांना कोण अधिक मूर्ख बनवत वेड्यात काढतो व त्यांच्या मतांवर सत्ता मिळवतो यात साऱ्या पक्षांची स्पर्धा लागलेली दिसते.
          देशातल्या साठ टक्के लोकसंख्येच्या मतांवर सत्ता उपभोगणाऱ्या सरकारांची प्राथमिकता कुणासाठी आहे ते बघा. पहिली प्राथमिकता तर स्वतःसाठी असणार हे निश्चित असतांनाच देशातील जनतेचे आपण काही देणे लागतो हे न लक्षात घेता एकदा सत्ता मिळाली की पाच वर्षात देशाची सारी राजकीय, सामाजिक व आर्थिक घडी विस्कवटत आपला निजी कार्यक्रम ढकलत रहाण्याचा उद्योग चालतो. कर्जमुक्तीसाठी राज्याकडे पैसे नसल्याची सबब सांगितली जाते. कुणीही जनसामान्यांनी मागणी न केलेल्या स्मारकांसाठी यांच्याकडे पैसे आहेत. निव्वळ समुद्रात घडाभर पाणी ओतण्याच्या स्मारकांच्या पूजेसाठी सत्तर पंचात्तर कोटी हे खर्च करू शकतात. त्यातल्या जाहिरातीत ज्याच्या जीवावर हा सारा खेळ चाललाय तो शिवाजी एका कोपऱ्यात व यांच्या छब्या डोळ्यात भरतील अशा. देशातील किती टक्के लोक ज्या बुलेट ट्रेन मधून जाऊन आपल्या देशाचा उध्दार करतील याचा विचार न करतां नव्वद हजार कोटी खर्च करण्याची यांची तयारी असते. वर मखलाशी करतात की यासाठी कर्ज मिळणार आहे म्हणून. अरे फुकट्यांनो, तुम्ही हातात कटोरा घेऊन साऱ्या जगात तरी फिरलात तरी तुम्हाला तुमच्या लायकीवर कोणी एक फुटकी कवडी देणार नाही. देशाला कर्ज मिळते ते देशातील जनतेच्या साधनसामग्रीवर, उद्यमशीलतेवर व उत्पादकतेवर. कर्ज देणारा देश देशातील जनतेच्या पतीवर तुम्हाला कर्ज देतो, तुम्ही तर पाच वर्षांचे भाडेकरू आहात, देशाचे कायमस्वरूपी मालक असल्यासारखे वागून जनतेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करण्याचेच तुमचे कर्तृत्व रहाणार आहे, जरा जमीनीवर या.
          समृध्दीचा कुठलाही मागमूस नसलेली केवळ उत्पादनाचे माध्यम हस्तगत करण्यासाठी केवळ सातशे किमि चा हा रस्ता प्रकल्प हा राज्यातील पंचवीस टक्के शेतकऱ्यांना त्यांची उपजाऊ जमीन न उपजिविकेचे साधन हस्तगत करत त्यांना देशोधडीला लावणार आहे. या प्रस्तावित रस्त्याच्या आजूबाजूच्या जमीनी या कधीच राजकारणी व प्रशासनातील बड्या धेंडानी लुबाडल्या आहेत. आपल्या कारभारातून निर्माण होणाऱ्या प्रचंड भ्रष्टाचारी पैशांच्या गुंतवणुकीचे एक सुलभ साधन म्हणून सरकार हा प्रकल्प राबवण्याचा अट्टाहास धरते आहे. उत्पादनाची साधने आपल्या ताब्यात घेण्याच्या या प्रकल्पातून काही दिवसांनी हाच परागंदा झालेला शेतकरी या बड्या धेंडाकडे गुलाम म्हणून राबणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
          या फुकटखाऊ संस्कृतीची सारी मदार ही राज्याच्या कारभारातून निर्माण होणाऱ्या अवैध संपत्तीवर असते. यांच्या दृष्टीने चराऊ कुरण असते ते औद्योगिक क्षेत्र, व्यापार-सेवा क्षेत्र व राहिलेले कृषि क्षेत्र. यापैकी औद्योगिक व सेवा क्षेत्रातील शोषणावर त्यातील संघटितपणा, कायदे व त्या क्षेत्राची जागरूकता यामुळे अगोदरच मर्यादा येत असतात. राहिले ते कृषि क्षेत्र त्यातील शोषणाची व्याप्ती, आकार व सुलभता पाहिली तर एक कर्जमाफी काय शेतकऱ्यांना तुमच्या भुक्कड कर्जाची आवश्यकताच कधी रहाणार नाही एवढे सामर्थ्य असल्याचे सारी आकडेवारी सांगते. या आकडेवारीकडे सरकार सहेतुक दूर्लक्ष करीत असते कारण त्यातील स्फोटकता. सदरची आकडेवारी ही कुणा बाहेरच्या अभ्यास व संस्थेची नसून वैधानिकरित्या स्थापन झालेल्या कॅग या घटनात्मक संस्थेची आहे. मी पहिल्यांदा यातील आकडेवारीनुसार शेतीच्या शोषणाचा आकडा प्रसिध्द केला तेव्हा अनेक वृत्तपत्रांची ती हेडलाईन होती. सत्ताधारी तिच्याकडे दूर्लक्ष करणार हे स्वाभाविकच असले तरी विरोधकांनाही त्यात अभ्यास करावा असे वाटले नाही. कारण हे चराऊ कुरण साऱ्यांना त्याची घडी विसकटू न देता जसेच्या तसे खायला हवे असते.
          एकीकडे शेतीक्षेत्राला प्रचंड मदती देत असल्याचे सांगत रहायचे, मात्र ती मदत शेतकऱ्यांकडे न जाता कुठे जाते यांच्या तक्रारींकडे दूर्लक्ष करीत रहायचे हा या व्यवस्थेचा स्थायीभाव झाला आहे. दोन चार हजाराचे वीज बिल न भरलेल्या शेतकऱ्यांचे ही व्यवस्था वाभाडे काढते मात्र शेतकऱ्यांच्या मदतीचे करोडो रुपयांचे अपहरण करणाऱ्या एकाही अधिकाऱ्यावर काय कारवाई केली हे सरकारने दाखवावे. अशी कारवाई होणे कधीच शक्य नाही कारण सरकार या व्यवस्थेचा सारा जीव या भ्रष्टाचारी रसदीत असतो व वरवर एकादा कर्मचारी तात्पुरता निलंबित करून सारी चौकशी थाबवण्यातच साऱ्यांचा प्रयत्न असतो. राज्याचा कृषिमंत्री आपल्या खात्यात नेमके काय चालले याबाबत अनभिज्ञ असेल व शेतकऱ्यांच्या करोडोंच्या मदती लाटणाऱ्या अधिकाऱ्याचा त्याला मागमूसही नसेल तर कुणाच्या हाती आपण राज्याच्या तिजोरीच्या किल्ल्या सोपवल्या आहेत या विचाराने धडकी भरते. यातलं वास्तव असे आहे की अशा प्रकारात मंत्र्यांपासून चपराशापर्यंत सारे सामील असतात व उघडकीस आलेले प्रकरण कसे हाताळावे यात आपली नोकरशाही पारंगत झाल्याने मिटवामिटवीत त्याचा फायदा परत त्याच व्यवस्थेला होत असतो. ज्याचे पैसे लुबाडले गेले तो शेतकरी मात्र आपल्या मदती कुठे गेल्या या शोधात वेडा ठरत रहातो.
          ज्याच्या घरात चोरी झाली तो शेतकरी आपली लूट कुठे हे न शोधता त्याला परत या चोरांचीच याचना करावी लागते यासारखा विरोधाभास नसेल. फक्त जागरूक शेतकरी जरी एकत्र आला तरी फारसे प्रयास न करता निष्फळ आंदोलने न करता सरकारला कचाट्यात पकडू शकतो. मात्र आज अगतिक ठरलेला शेतकरी आपल्या डोळ्यावरील झापडं जोवर काढत नाही तोवर ही राजकीय व्यवस्था त्याचा फूटबॉल करीत राहील एवढे मात्र नक्की !!
                                                                  डॉ. गिरधर पाटील 9422263689
(यातील लूटवापसीचा कार्यक्रम पुढच्या लेखात)