शेतक-यांची एकी कशी ?
मी ब-याचदा माझ्या इतरही लेखांतून शेतक-यांच्या एकीकरणाची संकल्पना मांडत
असतो. मात्र यावरची सर्वसामान्य शेतक-यांची प्रतिक्रिया ही ठामपणे अशी एकी होणार
नाही अशी असते. काही प्रमाणात ते वास्तवही असले तरी शेतक-यांचा एकंदरीतच आपल्या
स्वतःबद्दल, स्वतःच्या व्यवसायाबद्दल व आपण ज्या व्यवस्थेत वावरतो त्या
व्यवस्थेबद्दल अनेक समज गैसमज असल्याने एक प्रकारचा वैचारिक गोंधळ जाणवतो व जेथे
परिस्थितीचे आकलनच नीटसे झालेले नसते त्या परिस्थितीचे विश्लेषण करून त्यावर उपाय
योजना सुचवणे हे लांबच रहाते. आताशा प्रसिध्दी माध्यमे व माहितीच्या महापूरामुळे
बरेचशे शेतकरी हे सारे समजू लागले आहेत व त्याचे योग्य रितीने मूल्यमापन करत
एकंदरीत परिस्थितीला सामोरे जात आहेत, परंतु शेतक-यांचा मुख्य समुदाय एका समान
मानसिक पातळीवर आणून त्यांची वैचारिक एकी जोवर प्रस्थापित करता येत नाही तोवर
लोकशाहीत अपरिहार्य असलेल्या संख्येचा दबाब तयार होत नाही. असा दबाब शेतीविषयक
कायदे व आवश्यक असणारे योग्य ते धोरणात्मक निर्णय बाध्य करण्यास आवश्यक असल्याने
अशा समान वैचारिक एकीची गरज भासते.
आता शेतक-यांची एकी करणे म्हणजे नवी संघटना काढणे नव्हे वा एकादे नवे नेतृत्व
उभे करून त्याला आपला तारणहार मानत उध्दाराची वाट बघणेही नव्हे. संघटना आली की
पदाधिकारी व अधिकाराची उतरंड आली. अशी व्यवस्था ही व्यक्तीगत स्वभावाचे कंगोरे
प्रखर करत मानापानाच्या भ्रामक कल्पनांना वाव मिळत फुटीरतेला सामोरे जात असते. जे
आपण आज सा-या शेतक-यांच्या संघटनांमध्ये बघत असतो. एक तर गरिबांचा स्वाभिमान
नेहमीच नाकाच्या शेंड्यावर असतो तो कधी जागृत होईल ते सांगता येत नाही मात्र यातून
संघटनेची उद्दिष्टे साध्य होतीलच असे नाही. आपण मानत असलेले नेतृत्व विकावू सिध्द
झाले तर निराशेला पारावार रहात नाही. अगदी महत्प्रयासाने विचाराअंती स्थापन
झालेल्या संघटनांना केवळ ही बाजू सांभाळता न आल्याने शेतक-यांच्या निराशेला
कारणीभूत झाल्या आहेत. काही संघटनात तर फक्त नेते असतात व माध्यमांतील फटींचा
फायदा घेत त्या आपले अस्तित्व दाखवत रहातात. एकादा प्रश्न मोठ्या जनसंख्येला बाघित
करणारा वाटला की काही संधीसाधू राजकारणी त्याचा गैरफायदा घेत त्या प्रश्नाचा लढा
उभा करण्याचे नाटक करतात व त्यातूनही काही संघटनांना जन्म दिला जातो. अशा या
वेगवेगळ्या कारणानी, वेगवेगळ्या माध्यमातून अशा संघटनांचे पेव फुटत असते व
सर्वसामान्य शेतकरी याकडे अंचब्याने बघत एवढ्या सा-या संघटनांची एकी कशी होणार असे
कोडे स्वतःलाच घालत असतो. यात परत गावगुंडीचे राजकारण, पक्षीय राजकारण वा
व्यक्तीगत स्वार्थाचे राजकारण शेतक-यांना एका समान मानसिकतेला येण्यापासून
परावृत्त करीत असते, त्याच्या खोट्या प्रचाराला बळी पडत या प्रयत्नातील शेतक-यांना
नाउमेद केले जाते.
तेव्हा या सहजगत्या निष्प्रभ होत
जाणा-या मार्गाचा अवलंब न करता एक निश्चित ध्येय व हेतु मनात ठेवत सा-या
शेतक-यांच्या मनात समान विचाराचा कोपरा तयार करता आला तर या प्रचलित संघटनांपेक्षा
अधिक यश मिळवता येऊ शकते. हे मी सांगत नाही तर इतिहासात अनेकवेळा सिध्द झालेले
प्रमेय आहे. याचे एक चपखल उदाहरण देतो. भारताचा स्वातंत्र्य लढा हा काही एका
रात्रीतून उभा राहिला नाही. त्यात अनेक जातीचे, धर्माचे, भागाचे, भाषेचे, रंगाचे,
आर्थिक विषमतेचे, विविध व्यवसायांचे लोक सामील झाले होते. एवढेच नव्हे विविध
राजकीय पक्षांचे व विचारधारेचे लोकही यात तेवढेच सक्रिय होते. या सा-यांना कोणी
एकत्र या म्हणून कधी संघटना बांधत फिरले नव्हते. या सा-यांना एका समान
नेतृत्वाचीही गरज कधी भासली नाही. महात्मा गाधींना स्वातंत्र्य लढ्याचे नेते मानले
जात असले तरी त्यांना विरोध करणारे कमी नव्हते. एकाच पक्षातील नेहरू व सरदार पटेलांचे
मतभेद हे जगजाहीर आहेत. एवढे असून देखील सारे स्वातंत्र्य लढ्यात होते व
सा-यांच्या प्रयत्नाने शेवटी स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य लढ्याची वैशिष्ठे
अशी की सर्व प्रथम सा-यांना काय मिळवायचे हे निश्चित होते, ते कोणापासून मिळवायचे
हेही निश्चित होते, मात्र कसे मिळवायचे हे प्रत्येकाने आपापला मार्ग निवडत निश्चित
केले होते. म्हणजे एकाद्या लढ्याचे आकलन स्पष्ट असले, शत्रु समान असला व ते का व
कशासाठी मिळवायचे हे निश्चित असणे म्हणजेच सारा जनसमुदाय एका निश्चित अशा समान
पातळीव आणत एक समान ध्येय व उद्दिष्टपूर्ती गाठणे शक्य आहे. आपल्याला मोठी संघटना
न उभी करता, एकाद्यालाच सर्वांचा नेता असे न मानता आपल्या आर्थिक स्वातंत्र्याचा
लढा जिंकता येणे शक्य आहे, त्याला एकच पूर्वअट आहे ती सर्वांच्या समान मानसिकतेची
व समान उद्दिष्टाची.
आपण जिथेही असाल, म्हणजे एकादी संघटना असेल, एकादा पक्ष असेल, आपली
जातपात-धर्म एक नसेल, आपण कुठल्या सामाजिक वा आर्थिक उतरंडीवर आहात याचे या एकीला
काहीएक घेणेदेणे नाही. प्रश्न फक्त तुम्हाला जे मिळवायचे आहे ते शेतक-यांचे
सुखसमाधानाचे जीवन व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार यासाठी जे काही आवश्यक आहे ते
प्राधान्याने करीत रहाणे. आपली मानसिक विचाराची बैठक निश्चित असली व आकलन स्पष्ट
असले तर एकाद्या परिस्थितीत काय करायचे या आदेशाची वाट पहायची काही एक गरज नाही.
जे काही आवश्यक आहे ते अपेक्षित वर्तन आपणच नव्हे तर आपले समविचारी एकाच वेळेला
प्रतिक्रियेत होत एक अघोषित आंदोलन आपोआप उभे राहू शकते. कांद्यावर संकट आले की
कांदेवाले रस्त्यावर येतात, उसादराचा प्रश्न निर्माण झाला की उसउत्पादक हातात
टिपरं घेतात, यात सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्वजातीय एकाच वेळी उठतात कारण
सा-यांचे दुःख एक असते व मुळात सारे शेतकरी असतात व सर्वांना यातून सुटका हवी
असते. संघटना आहे किंवा नाही याची वाट न बघता हे सारे होत असते. हीच संकल्पना
शेतीवरच्या या व्यापक संकटाशी मुकाबला करतांना आपल्याला वापरावी लागेल. मात्र
सर्वात अगोदर आपण सारे शेतकरी आहोत हे निश्चित करणे हे अत्यावश्यक आहे.
डॉ. गिरधर पाटील 9422263689.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा