शेतक-यांची एकी कां ?
मागच्या लेखात शेतक-यांची एकी कां व कशी
याची पार्श्वभूमि स्पष्ट केली होती. या लेखात मात्र अशी एकी कां आवश्यक आहे त्याची
कारणे देत ती जर लक्षात आणता येऊ शकली तर एकीकरणाची प्रक्रिया सुलभ होऊ शकेल.
मात्र पक्षीय राजकारणातील एकी या संकल्पनेचा व शेतकरी वर्गाच्या एकीची संकल्पना
यातील फरक देखील समजून घेतला पाहिजे. एकी म्हटले की आपल्या समोर ज्या एकीचे चित्र
उभे रहाते त्यात प्रामुख्याने ज्यांच्यामुळे एकी होऊ शकत नाही अशा नेत्यांच्या
एकीचे प्रयत्न असे चित्र उभे रहाते. ही एकी विचारांची नसते तर व्यक्तींची असते,
मनांची नसते तर मतांची असते व सत्ताप्राप्तीच्या राजकारणातील ती एक खेळी असते. आपल्याला
मात्र नेत्यांच्या एकी पेक्षा सामान्य शेतक-यांची आपल्या समस्या व त्यावरील
उपाययोजना याबाबतच्या किमान समान कार्यक्रमावर सहमती दर्शवत वैचारिक एकी निर्माण
करायची आहे. अशी सहमती झाली म्हणजे विरोधाची व संघर्षाची धार बोथट झाल्याने
गटातटाचे व कुरघोड्यांचे प्रकार संपुष्टात येऊन अधिक उर्जा व काळ यांचे हरण न होता
उद्दिष्ठपूर्ती त्वरित गाठता येते. वैचारिक एकीचा आणखी एक फायदा म्हणजे अशा समान
कार्यक्रमाची भाषा जेव्हा जनतेतील एक समुदाय प्रकर्षाने एकसुरात व्यक्त करू लागतो
त्याला एक विशेष वजन प्राप्त होते व सरकारला ते नजरेआड करणे जड जाते व त्यावर
विचार व उपाययोजनांच्या शक्यताही वाढतात.
अशा वैचारिक एकीला संख्यात्मक बळ तेवढेच
आवश्यक असते. हे संख्यात्मक बळ आपण ज्या राजकीय व्यवस्था म्हणजे लोकशाहीत वावरत
असतो तेथे अनेक प्रकारानी उपयुक्त ठरते. धोरणात्मक बदलासाठी सद्य सरकारवर आणायचा
दबाब तर महत्वाचा असतोच, त्याहीपुढे जाऊन सत्तापरिवर्तनात तेवढीच महत्वाची भूमिका
बजावण्याची शक्यता असल्याने सारे सत्तापिपासू राजकीय पक्ष आपसूक अशा जनसमुदायाची
दखल घेतात. लोकसंख्येत महत्वाचे असणारे आकड्याचे गणित जर जनतेच्या वा मतदारांच्या
लक्षात येत नसेल तर परिणामकारक संख्याबळ असून देखील या मायाजाली लोकशाहीत तो वर्ग
बेदखल राहण्याचीच जास्त शक्यता असते. याचे चांगले उदाहरण म्हणजे भारतातील शेतकरी
समुदायाचे देता येईल. या बहुपेडी समाजाचे स्वरूप सा-या देशभरातून विविधतामे एकता
या तत्वानुसार वेगवेगळे असून सा-यांना समान पातळीवर आणणा-या शेतीविषयक समस्या या
सा-यांना सारख्याच भेडसावत असल्याने ते एका वर्गीय समीकरणात येऊ शकतात. मात्र हा
वर्ग आज त्या विखुरलेल्या अवस्थेत या राजकीय व्यवस्थेत भरकटतो आहे त्याची ना तर
सरकारला दखल घेणे क्रमप्राप्त वाटते ना विरोधी पक्षांना त्यात फारसे स्वारस्य
रहाते. आज राज्यातील लोकसंख्येत कमी कमी होत असली तरी पंचावन्न टक्क्यांनी असणा-या
शेतकरी वर्गाची राजकीय ओळख अधोरेखित न झाल्याने त्याहीपेक्षा संख्येने किरकोळ
असणारे समाजगट आपल्या प्रश्नांची चांगल्या पध्दतीने लावून घेत असल्याची उदाहरणे
आहेत.
आज सरकार सा-या शेतक-यांच्या
प्रश्नांकडे ज्या अनास्थेने पहात आहे त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे या वर्गाची
सिध्द न झालेली राजकीय ताकद. प्रचलित धारणेनुसार ही ताकद एकतर आंदोलनातून दिसायला
हवी नाहीतर मतपेटीतून दिसायला हवी. सरकारला समजणारी भाषा अजूनतरी शेतक-यांच्या
हाती न लागल्याने त्यांचे सारे प्रश्न वैध व रास्त असून देखील त्यांची तड लावणे
एवढ्यामोठ्या जनसमुदायाला जड जाते. आजची सारी आंदोलने व त्यांचे स्वरूप बघता ही
आंदोलने सरकारला नेस्तनाबूद करणे सोपे जाते व महत्प्रयासाने एकत्र आलेल्या
समाजगटाची तोडफोडही करणेही शक्य होते. तेव्हा चळवळीचे नुकसान टाळणारी आंदोलनाची
एकंदरीत दिशा व स्वरूप बदलण्यासाठी अशा मोठ्या व व्यापक एकीची गरज भासते.
आजचा शेतकरी आपल्यावर होणा-या
अन्यायाबाबत जागरूक नाही असेही म्हणता येत नाही. कारण ज्या पध्दतीने अगदी
बांधावरचा अशिक्षित शेतकरी त्या तीव्रतेने या परिस्थितीत प्रतिक्रिया देत आहे
त्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. ठिकठिकाणी आंदोलने होताहेत, मेळावे भरवले जात आहे,
विविध विषय व पिकवार अधिवेशने होत आहेत, शेतकरी साहित्य संमेलने होऊ लागली आहेत,
छोट्यामोठ्या संघटना वेगवेगळ्या नावाने आपले संसार थाटून बसल्या आहेत, फेसबुक,
ट्वीटर वा वॉट्सपसारख्या सोशल मिडियात रोज शेतकरी प्रश्न व उपायाचा रतीब घातला
जातोय. मात्र हे सारे एवढे मोठे काम विखुरलेल्या स्थितीत होत असल्याने करण्यातील
सारे श्रम, पैसे वा वेळ वाया जात त्याचा परिणाम मात्र सरकारवर होतोय असे दिसत
नाहीत. कारण एवढ्या प्रयत्नांनंतरसुध्दा शेतक-यांचे वा ग्रामीण जीवनाचे अगदी साधे
साधे प्रश्नसुध्दा सुटलेले दिसत नाहीत व हे सारे कां होत नाही हे डोक्याला हात
लावत सारा शेतकरी वर्ग स्वतःलाच विचारत निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खात आहे.
शेतक-यांपेक्षा कितीतरी संख्येने कमी
असणारे शिक्षक-प्राध्यापक, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, माथाडी यांनी साधी
संपाची हाळी दिली तरी सरकार त्यांच्या मागण्या वैध असोत वा नसोत ताबडतोबीने मान्य
करते. याचे प्रमुख कारण म्हणजे शिक्षक-प्राध्यापकांचा संप हा परिक्षेच्या तोंडावर
जाहीर केला जातो, सफाई कामगार पावसाळ्याच्या तोंडावर संपावर जाऊन आपल्या मागण्या
मान्य करून घेतात. बाजार समित्यांतील माथाडींनी तर केवळ बाजार बंद पाडण्याच्या
धमकीवर बेकायदेशीर मागण्याही सरकारकडून पदरात पाडून घेतल्या आहेत. असे सारे
असतांना शेतक-यांना जर आपले प्रश्न सोडवण्याचा मार्ग सापडत नसेल त्याची शोध
घेण्याची पध्दत वा जागा कुठेतरी चूकते आहे असे समजले पाहिजे.
अशी एकी करणे म्हणजे परत एकादी नवी
संघटना काढणे नव्हे. आपल्या डोक्यात बसलेल्या या जून्या व पक्क्या झालेल्या
संकल्पना आता बदलल्या पाहिजेत. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने आपण व्यक्तींबरोबर
विचाराचेही नेटवर्कींग करू शकतो. एकदा विचार डोक्यात पक्का झाला म्हणजे एकाद्या
जनसमुदायाचे सामुहिक वर्तन तुम्हास नियंत्रित करता येते. असे सामुहिक वर्तन जर
राज्य व्यवस्थेवर दबाब आणण्या इतपत सक्षम ठरले तर कुठला रस्ता रोको करायची गरज
नाही वा लाठ्याकाठ्या खाऊन खोट्या केसिस दाखल करून तुरूंगात जायची गरज नाही. एवढा
सोपा व सरळ मार्ग आपण कसा व किती स्विकारतो यावर सा-या शेतकरी समाजाचे भवितव्य
ठरणार आहे.
डॉ. गिरधर पाटील 9422263689